​सावंतवाडी : ‘शक्ती’ या संभाव्य चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग आणि कोकण किनारपट्टीवरील सर्व बंदरांवर दोन नंबरचा धोक्याचा बावटा (सिग्नल) फडकवण्यात आला आहे. या वादळाची तीव्रता वाढत असल्यामुळे प्रशासनाने मच्छीमारांना तातडीने सतर्कतेचा इशारा दिला आहे.दोन नंबरचा बावटा हा समुद्रात मासेमारीसाठी जाण्यास सक्त मनाई दर्शवणारा धोक्याचा सूचक आहे. प्रशासनाने मच्छीमारांना खोल समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. तसेच, जे मच्छीमार सध्या समुद्रात आहेत, त्यांना तातडीने किनाऱ्यावर परतण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

​हवामान विभागानेही या वादळाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. ‘शक्ती’ चक्रीवादळाचा मध्यम तीव्रतेचा फटका मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीला बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि विशेषतः किनारपट्टीजवळील लोकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.