लोकसत्ता वार्ताहर

नांदेड : नांदेडच्या चव्हाण परिवारातील तीन लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघात ज्या उपक्रमामध्ये कधीही ‘हात’ घातला नाही अशा रोजगार मिळवून देण्याच्या महत्वाकांक्षी उपक्रमात शंकररावांच्या आमदार झालेल्या नातीने पहिले पाऊल टाकले असून त्यामुळे भोकर मतदारसंघातील बेरोजगारांची ‘उमेद’ वाढली असल्याचे सांगितले जात आहे.

भोकर आणि पूर्वीच्या मुदखेड या दोन विधानसभा मतदारसंघांशी चव्हाण परिवाराचे गेल्या सहा दशकांपासून नाते असून शंकरराव, अशोकराव आणि अमिता चव्हाण यांनी या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व केल्यानंतर याच परिवारातील श्रीजया ही युवती आता त्यांचा राजकीय वारसा चालवत आहे. चार महिन्यांपूर्वी विधानसभेवर निवडून आल्यानंतर श्रीजया चव्हाण यांनी आपल्या मतदारसंघात ‘युवा उमेद’ उपक्रमांतर्गत बेरोजगारांना नोकरी-रोजगार मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

शंकरराव आणि अशोक चव्हाण हे पिता-पुत्र दोघेही दीर्घकाळ राज्याच्या सत्तेत राहिले, तरी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर किंवा लातूर या जिल्ह्यांच्या तुलनेत नांदेड जिल्हा औद्योगिक विकास आणि त्या माध्यमातून रोजगार निर्माण करण्यात पिछाडीवर राहिला. जिल्ह्यातील बेरोजगारांना याचा मोठा फटका बसला. भोकर येथे औद्योगिक वसाहत उभी राहिले, पण तेथे प्रकल्पच आले नाहीत.

अलीकडच्या काळात मराठा आरक्षण आंदोलनाच्या निमित्ताने अशोक चव्हाण व त्यांच्या परिवाराला आपल्या या प्रभावक्षेत्रातच मोठ्या रोषाला तोंड द्यावे लागले होते. ठिकठिकाणी तरुण कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोर आपला राग उघड केला, तरी निवडणूक काळात चव्हाण परिवाराने एकंदर स्थिती संयमाने हाताळली होती. विधानसभा निवडणुकीत चव्हाणांची कन्या भाजपाची उमेदवार झाल्यानंतर काँग्रेस व चव्हाण परिवाराला मानणारा मोठा समूह दुभंगला होता, पण निवडणुकीमध्ये शेवटी श्रीजया चव्हाण यांचीच सरशी झाली.

भोकर मतदारसंघाच्या भौतिक विकासाच्या विषयात राज्यसभेचे खासदार या नात्याने स्वतः अशोक चव्हाण लक्ष घालत असताना त्यांच्या कन्येने मात्र सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगाराच्या वळणावर आणण्याचा उपक्रम हाती घेतला असून त्यातील पहिला मेळावा पुढील आठवड्यात २२ तारखेला अर्धापूर येथे होणार आहे.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आ.श्रीजया चव्हाण यांनी मुंबई-पुणे-नागपूर-नाशिक-छ.संभाजीनगर तसेच चेन्नई, हैदराबाद व बंगळुरूस्थित अनेक बड्या कंपन्यांशी संपर्क साधून त्यांच्या संबंधित तज्ज्ञ अधिकार्‍यांना येथे पाचारण केले आहे. दहावी-बारावी उत्तीर्ण तसेच तांत्रिक शिक्षण घेतलेल्या बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी वरील मेळावा निश्चित झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वरील मेळाव्यात मुलाखतींसाठी येणार्‍या तरुणांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, त्यांची पूर्वतयारी झालेली असावी यासाठी भोकर-मुदखेड आणि अर्धापूर या तीन तालुक्यांतील वेगवेगळ्या गावांमध्ये मागील १० दिवसांपासून मेळावापूर्व प्रशिक्षणाचे कार्यक्रम होत आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या विषयांतील तज्ज्ञ तरुणांना मार्गदर्शन करत असल्याचे दिसून आले. २२ तारखेच्या रोजगार मेळाव्यात प्रशिक्षित तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आ.श्रीजया चव्हाण यांनी केले आहे.