माढा लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सदाशिव खोत व सोलापूर राखीव मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अॅड. शरद बनसोडे यांनी सोमवारी दुपारी शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारीअर्ज दाखल केले. या वेळी मोठा जनसमुदाय शक्तिप्रदर्शनात सहभागी होता.
चार हुतात्मा पुतळ्यांना अभिवादन करून सदाशिव खोत व अॅड. शरद बनसोडे यांनी बैलगाडीत विराजमान होत मिरवणुकीने अर्ज दाखल केले. या वेळी भाजप-सेनेचे नेते व कार्यकर्त्यांच्या जोडीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. भाजपचे आमदार विजय देशमुख, अक्कलकोटचे भाजपचे आमदार सिद्रामप्पा पाटील, पक्षाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, शहरप्रमुख प्रताप चव्हाण, सेनेचे जिल्हा संपर्क उपप्रमुख पुरुषोत्तम बरडे, पालिकेतील विरोधी पक्षनेते कृष्णाहरी दुस्सा, नगरसेविका प्रा. मोहिनी पतकी, रोहिणी तडवळकर तसेच रिपाइंचे नेते राजा सरवदे आदी या मिरवणुकीत सहभागी झाले होते.
दरम्यान माजी खासदार सुभाष देशमुख यांच्यासह माजी महापौर किशोर देशपांडे, माजी नगरसेवक रामचंद्र जन्नू, मल्लिकार्जुन कावळे, विश्वनाथ बेद्रे, प्रभाकर जामगुंडे आदी मंडळी या मिरवणुकीपासून दूर होती.