Sharad Pawar News : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून चांगलंच राजकारण तापलेलं आहे. यातच काही दिवसांपूर्वी कुणबी नोंद असलेल्या मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत राज्य सरकारने २ सप्टेंबर रोजी अध्यादेश काढला. या अध्यादेशामुळे ओबीसी आक्रमक झाले. सरकारच्या अध्यादेशामुळे ओबीसींवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

राज्यात सध्या ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा गंभीर बनला असून ओबीसी आणि मराठा समाज आमने-सामने येत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याच मुद्यांवरून नेत्यांमध्येही आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यामुळे काही ठिकाणी सामाजिक समतोल ढासळत असल्याचंही चित्र पाहायला मिळत आहे.

दरम्यान, राज्यातील सामाजिक ऐक्यावर आणि राज्यातील राजकीय परिस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिकमधील एका कार्यक्रमात बोलताना मोठं विधान केलं आहे. ‘काय वाट्टेल ती किंमत मोजू, पण महाराष्ट्र एकसंघ कसा राहील यासाठी प्रयत्न करू’, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

शरद पवार काय म्हणाले?

“महाराष्ट्राचं चित्र सध्या थोडं वेगळं झालेलं आहे. समतेचा विचार हा अस्थिर होतोय का काय असं दिसतंय. समाजिक ऐक्याची वीण उसवली जात असल्याचं चित्र दिसत आहे. माझ्या मते महाराष्ट्रासमोर हे एक प्रकारचं आव्हान आहे. मात्र, काय वाट्टेल ती किंमत मोजू पण सामाजिक ऐक्य जपू, महाराष्ट्र एकसंघ कसा राहिल यासाठी आणि महाराष्ट्रातील सर्व जाती धर्मांच्या लोकांना एकत्रित कसं ठेवता येईल यासाठी व महाराष्ट्राचा लौकिक पुढे घेऊन जाण्यासाठी जे काही करावं लागेल ते करण्यासाठी तुम्ही आम्ही आणि सर्वांनी पुढे आलं पाहिजे”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.