Sharad Pawar : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून चांगलंच राजकारण तापलेलं आहे. यातच काही दिवसांपूर्वी कुणबी नोंद असलेल्या मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत सरकारने २ सप्टेंबर रोजी अध्यादेश काढला. या अध्यादेशामुळे ओबीसींवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. राज्यात सध्या ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा गंभीर बनला असून ओबीसी आणि मराठा समाज आमने-सामने येत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
दरम्यान, या सर्व मुद्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिकमधील मेळाव्यात बोलताना सविस्तर प्रतिक्रिया मांडली. मात्र, या मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी भर कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांचे कान टोचल्याचं पाहायला मिळालं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी भाषण करताना बजरंग सोनवणे यांच्याकडे पाहून काही प्रश्न विचारले होते. मात्र, अशा प्रकारे बजरंग सोनवणे यांच्याकडे पाहून जितेंद्र आव्हाड यांना प्रश्न विचारण्याची गरज नव्हती, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
शरद पवार काय म्हणाले?
“महाराष्ट्राच्या परिस्थितीबाबत जितेंद्र आव्हाड यांनी काल अतिशय चांगली मांडणी केली. मात्र, ती मांडणी करत असताना त्यांनी दोन ते तीन प्रश्न खासदार बजरंग सोनवणे यांना विचारले. पण मला असं वाटतं की जितेंद्र आव्हाड यांना तसा प्रश्न बजरंग सोनवणे यांना विचारण्याची गरज नव्हती. बजरंग सोनवणे असो किंवा बाकी कोणी असो. राष्ट्रवादीचा प्रत्येक सहकारी या समाजिक ऐक्याचा प्रश्नांच्या बाबतीत सामाजिक ऐक्य साधणारा हा पक्ष आहे. सामाजिक ऐक्याच्या बाबतीत कोणतीही तडजोड करायची नाही या भूमिकेतून आपण सर्व काम करत आहोत. त्यामुळे आपल्यामध्येही ऐक्य असलं पाहिजे”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
जितेंद्र आव्हाडांनी नेमकं काय म्हटलं होतं?
“१५ ते २० टक्के आरक्षण वाढवा ना, मग येथील गुजर असो किंवा जाट असो. पाटीदार असो किंवा येथील मराठा असो. द्या त्यांना आरक्षण अशी आमची आग्रही मागणी आहे. आम्ही लोकसभेत तुमच्याबरोबर उभे राहू. शरद पवारांना न विचारता हे वाक्य मी बोलतोय. अन्यथा तुम्ही म्हणाल की तुम्हाला खासदारांचा अधिकार कोणी दिला? पण बाप्पा (बजरंग सोनवणे) आपण उभे राहणार की नाही? मराठ्यांना जेव्हा आरक्षणाचा कायदा हे सरकार आणेल, तेव्हा आमचे सर्व खासदार तुमच्या बरोबर उभे राहतील. हिम्मत असेल तर आणून दाखवा”, असं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं.
जितेंद्र आव्हाडांनी काय स्पष्टीकरण दिलं?
“शरद पवारांचा बोलताना संदर्भ मला समजला नाही. पण मी बोलताना माझा संदर्भ कुठेही चुकलेला नाही. त्यांच्या मनात काय होतं? हे मी सांगू शकत नाही. पण माझा काही संदर्भ चुकलाय असं मला वाटत नाही. मी बोलत असताना माझी एक सवय आहे की समोर जेवढे होते त्या सर्वांची मी नावे घेतो. खासदार लंके, जयंत पाटील यांचेही नावं मी घेतली होती. मी सर्वांची नावं घेतली, त्यामध्ये असा जातीय उल्लेख करण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता”, असं स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाडांनी दिलं.
बजरंग सोनवणे काय म्हणाले?
“जितेंद्र आव्हाड माझ्याविषयी बोलले असं नाही, तर बीडचा विषय आला म्हणून ते माझ्याकडे पाहून बोलले. तसेच शरद पवारांच्या बोलण्याचा अर्थ आहे की सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन आपल्याला हा लढा लढायचा आहे. आपण कोणत्याही जातीपातीच्या राजकारणाला थारा न देता सर्वजण आपण एक आहोत, एकसंघ म्हणून चांगली मांडणी केली. असा तो विषय झाला. जितेंद्र आव्हाड मला खोचकपणे बोलले असा काही विषय नाही. बीडचा विषय आला आणि मी समोर होतो म्हणून त्यांनी माझं नाव घेतलं”, असं खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटलं आहे.