अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी एक आवाहन केलं होतं की आता पवार आडनाव पाहून मतदान करा. इतके दिवस तुम्ही शरद पवारांना मत दिलंत, सुप्रियाला मत दिलंत, मला निवडून दिलंत. आता सुनेला निवडून द्या. याबाबत शरद पवार यांना विचारलं असता अजित पवार योग्यच बोलले. पण त्यात तुम्हाला एक गोष्ट सांगतो एक मूळ पवार आणि दुसरा बाहेरुन आलेला पवार असं आहे. यावर सगळे हसलेही. मात्र अजित पवारांच्या लग्नाला ३९ वर्षे झाली तरीही सून बाहेरची कशी? असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला आहे.

अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?

बारामतीतील सभेत बोलताना अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना या निवडणुकीत विजयी करण्याचे आवाहन केले होते. “तुम्ही आधी साहेबांना मतदान केलं, त्यानंतर मुलाला म्हणजेच मला मतदान केलं. नंतर मुलीला मतदान केलं. आता सुनेला मतदान करा म्हणजे तुम्हाला पवारांना मतदान केल्याचं समाधान मिळेल”, असे अजित पवार म्हणाले होते.

मी राजकारणाची सुरुवात केली तेव्हा तिशीत होतो. आता साठी पार केली आहे. त्यामुळे ही निवडणूक महत्त्वाची आहे. महायुतीचा उमेदवार कोण द्यायाचा याचा विचार केला. सुनेत्रा पवारांचं नाव पुढे आलं. आता कुणाला मतदान करायचं हा प्रश्न लोकांना पडला. त्यामुळे मी सांगतो पवार दिसेल त्या ठिकाणीच मतदान करा”, अशी प्रतिक्रियाही अजित पवारांनी दिली होती.

शरद पवारांनी काय उत्तर दिलं?

अजित पवार म्हणाले की पवार आडनावाला मतं द्या चुकीचं काय? एक गोष्ट लक्षात घ्या दोन गोष्टी असतात, एक मूळ पवार दुसरा बाहेरुन आलेला पवार. असं उत्तर दिलं आहे. शरद पवार म्हणाले, निवडणूक आल्यानंतर माझ्या कुटुंबातले सगळे लोक प्रचारात उतरतात. माझी निवडणूक असो, अजितची निवडणूक असो किंवा सुप्रियाची निवडणूक असो. आमच्या कुटुंबातले घटक असतात. त्यामुळे अजित पवार जे म्हणाले की त्यांच्या वेळी प्रचाराला कुणी गेलं नाही ते काही खरं नाही. लोकांच्यात जातात, भूमिका मांडतात. लोकांचा सहभाग निवडणुकीत कसा होईल हे पाहतात.

हे पण वाचा- अजित पवारांना शरद पवारांचं खास शैलीत उत्तर, “बाहेरुन आलेला पवार..

या सगळ्याबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत शरद पवारांना प्रश्न विचारला आहे. तसंच शरद पवारांचे विचार ऐकून वाईट वाटलं असंही अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.

काय म्हणाल्या अंजली दमानिया?

शरद पवार यांचं जे विधान आलं की मूळ पवार आणि बाहेरुन आलेला पवार. यात शरद पवार यांना नेमकं काय म्हणायचं आहे? एखादी सून ३० वर्षे, ४० वर्षे, ५० वर्षे जरी लग्न होऊन झाले असतील तरीही ती बाहेरची असते का? ती घरची होत नाही. त्यांचं हे बोलणं मला मुळीच पटलं नाही. काही दिवसांपूर्वी शरद पवारांचा व्हिडीओ आला होता. त्यात त्यांना विचारलं होतं की चितेला अग्नी द्यायला मुलगा नाही. त्यावर शरद पवार म्हणाले की मुलीला मुलासारखं वाढवून तिला तेवढं ताकदवान केलं पाहिजे. हे ऐकून मला बरं वाटलं होतं. अतिशिय प्रगतीशील विचार वाटले होते. मात्र बाहेरचा पवार असं जे शरद पवार बोलले ते मला मुळीच पसंत पडलेलं नाही. माझ्यासारख्या अनेक मुली, ज्या आता सुना झाल्या आहेत त्यांनाही ते पटलं नसावं, बिलकुल पटणार नाही. असं अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.

आता याबाबत शरद पवार काही भूमिका मांडणार का? किंवा यावर प्रश्न विचारला गेला तर उत्तर देतील का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.