अहिल्यानगर: आरक्षणाच्या प्रश्नात केंद्र सरकार व संसदेची भूमिका महत्त्वाची आहे, राज्यघटनेत दुरुस्ती केल्याशिवाय हा प्रश्न मार्गी लागणार नाही, यासाठी केंद्र सरकारची भूमिका महत्वाची आहे. दोन्ही समाजात कटुता वाढणार नाही, यासाठी धोरणात्मक भूमिका घेऊन जनमत तयार करावे लागणार असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार शरद पवार यांनी आज, शनिवारी नगरमध्ये बोलताना व्यक्त केले. तसेच हा प्रश्न केवळ महाराष्ट्र पुरता मर्यादित नसून इतर राज्यांनाही भूमिका पटवून द्यावी लागणार आहे, त्यामुळे आपण संसदेतल्या सहकाऱ्यांशी चर्चा करत आहोत, अशी माहितीही पवार यांनी यावेळी दिली.

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू यांच्या ७५ व्या अभिष्टचिंतन सोहळ्यात शरद पवार बोलत होते. यावेळी काँग्रेसचे माजीमंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, आमदार मोनिका राजळे, आमदार सत्यजित तांबे, आमदार हेमंत ओगले, खासदार निलेश लंके, राज्य सरकारच्या आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार आदी उपस्थित होते.

आज आरक्षणाच्या प्रश्नावरून समाजात वाद निर्माण झाला आहे. हा वाद समाजात कटूता निर्माण करत आहे. जे वर्ग शेतीपासून दुरावले आहेत ते आरक्षणाची मागणी करत आहेत. शेतीचे प्रश्न सर्वच क्षेत्रावर परिणाम करत आहेत. आमच्या संधीचं काय असा प्रश्न ते विचारत आहेत. त्यामुळेच आरक्षणाबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणार आहे. ५२ टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण नको असे काहीजण सांगतात. परंतु तामिळनाडूमध्ये ७२ टक्के आरक्षण दिले गेले आहे. याबाबत केंद्र सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे. वेळप्रसंगी राज्यघटनेत दुरुस्ती करून प्रश्न सोडवावा लागणार आहे. त्यासाठी आम्ही संसद सदस्यांशी संवाद साधत आहोत. याबाबतची भूमिका देशातील अन्य राज्यांनाही पटवून द्यावी लागणार आहे. हा प्रश्न केवळ महाराष्ट्रापुरता नाही. अन्य राज्यातही शेतकऱ्यांच्या प्रश्नातून तो निर्माण झालेला आहे. यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर राज्यघटनेबाबत एकत्रित भूमिका घेतली गेली पाहिजे, असेही पवार यांनी सांगितले.

भाजपवर टीका

स्वातंत्र्यापूर्वी नगर जिल्हा गांधी- नेहरूंच्या विचारांचा सन्मान करणारा होता. स्वातंत्र्यानंतर जिल्ह्यात साम्यवाद वाढला, परंतु त्यांचीही भूमिका तळातील लोकांना लाभ देण्याची, न्याय देण्याचीच होती. ६० च्या दशकानंतर जिल्ह्यात पुन्हा परिवर्तन झाले. यशवंतराव चव्हाण यांचा विचार नगर जिल्ह्याने पुढे नेला. महाराष्ट्राच्या हिताची जपणूक केली. त्यातील काही नेतृत्वाने राज्य व देश पातळीवर दिशा दिली. आज मात्र चित्र वेगळे दिसत आहे. केवळ नगरच नाहीतर देशातही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपची विचारधारा वाढत आहे. त्यातून सामाजिक ऐक्य हा चिंतेचा विषय झाला आहे, अशी टीका पवार यांनी या वेळी केली.