अयोध्येमध्ये राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची तयारी जोरात चालू असताना त्यावरून राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. सत्ताधारी व विरोधकांमध्ये यावरून दावे-प्रतिदावे पाहायला मिळत आहेत. एकीकडे देशपातळीवर राम मंदिराच्या मुद्द्यावर राजकारण चालू असताना दुसरीकडे राज्यात सत्ताधारी व विरोधकांमध्ये सुंदोपसुंदी पाहायला मिळत आहे. शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने भाजपा-शिंदे गट-अजित पवार गट व दुसरीकडे महाविकास आघाडी असा राडकीय सामना रंगू लागला आहे. यासंदर्भात अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी बोलताना थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे.

काय म्हणाले अमोल कोल्हे?

अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसंकल्प अभियानावर खोचक शब्दांत टीका केली. कोल्हेंच्या आक्रोश मोर्चाला गर्दी होत नसल्याची टीका सत्ताधाऱ्यांकडून झाल्यानंतर त्यासंदर्भात अमोल कोल्हेंनी प्रतिक्रिया दिली आहे. “मुख्यमंत्र्यांनी इतक्या घाईनं शिवसंकल्प अभियानाची सुरुवात शिरूर लोकसभा मतदारसंघातून करणं हेच शेतकरी आक्रोश मोर्चा जिथे पोहोचायचा तिथे पोहोचलाय याचं द्योतक आहे. मुख्यमंत्री इथे येत आहेत, त्यांच्याकडून अपेक्षा आहेत”, असं अमोल कोल्हे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना केलं लक्ष्य

दरम्यान, यावेळी बोलताना अमोल कोल्हे यांनी खोचक शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. “मुख्यमंत्र्यांनी दौऱ्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवड केली यासाठी मी मुख्यमंत्र्यांचं मनापासून आभार मानतो. त्यांचं शिरूर लोकसभा मतदारसंघात नक्कीच स्वागत आहे. पण तुम्ही येताना कांद्यावरची निर्यातबंदी उठली आहे, बिबटप्रवण क्षेत्रात थ्री फेज लाईट दिली आहे आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट पाच रूपये अनुदान आहे असे निर्णय घेऊन शिरूर लोकसभा मतदारसंघात या. आपलं स्वागत आहे”, असं अमोल कोल्हे म्हणाले.

“माझे पात्र…”, राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण न मिळाल्याने ‘रामायण’मधील लक्ष्मण नाराज, म्हणाले…

दरम्यान, यावेळी पत्रकारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका विधानाबाबत विचारणा केली असता अमोल कोल्हेंनी त्यावरून राज्यातील महायुती सरकारमधील घटकपक्षांना टोला लगावला. ‘देशात भाजपा सक्षम असून दुसऱ्या आघाडीची देशाला गरज नाही’ असं मोदींनी म्हटल्याचं माध्यमांनी विचारलं. यावर अमोल कोल्हे म्हणाले, “असं पंतप्रधान म्हणत असतील तर महायुतीचं नेमकं काय होणार? महायुतीतल्या घटकपक्षांसाठी पंतप्रधानांचं विधान चिंता करायला लावणारं आहे.”

अजित पवारांच्या दौऱ्यावरही खोचक टिप्पणी

यावेळी अजित पवारांनीही दौरा काढल्याचा मुद्दा माध्यम प्रतिनिधींनी उपस्थित करताच त्यावरही अमोल कोल्हेंनी खोचक टिप्पणी केली. “प्रत्येकाचा राजकीय पक्ष आहे. ते वेगवेगळे दौरे करत आहेत. पण महत्त्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तींनी केलेले दौरे राजकीय आहेत की खरंच जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आहेत हा प्रश्न जनतेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन तुम्ही जर हे दौरे केले तर ती भूमिका जास्त महत्त्वाची ठरेल”, असं अमोल कोल्हे म्हणाले.