सातारा : साताऱ्याचे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने लवकरच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांनी औंध येथे नुकतीच भेट घेत चर्चा केली. या चर्चेवेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, आमदार सचिन पाटील, प्रभाकर घार्गे, प्रभाकर देशमुख, उदयसिंह पाटील, अनिल देसाई, अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर आदी उपस्थित होते. त्यांचा प्रवेशाचा कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाईल, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २०२३ मध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांचे जवळचे मानले जाणारे सुनील माने त्यांच्याबरोबरच जातील, असा कयास जिल्हाभर बांधला जात होता. मात्र त्या वेळी एकत्रित पक्षाचे जिल्हाध्यक्ष असलेले माने यांनी शरद पवार पक्षासोबतच राहण्याचा निर्णय घेतला होता. मागील काही दिवसांपासून सुनील माने यांच्यावर कार्यकर्त्यांकडून अजित पवार पक्षात प्रवेश करण्याबाबत दबाव वाढत आहे.

पवार गट जिल्ह्यात अल्पमतामध्ये आलेला आहे. सत्तेशिवाय जनतेची अनेक कामे करणे अवघड जात आहे. तसेच आगामी पालिका निवडणुकांसाठी अजित पवार यांच्यासोबत राहिल्यास फायदा होऊ शकतो. या विचारांनी माने यांच्या कार्यकर्त्यांकडून पक्ष बदलासाठी आग्रह वाढला होता. या पार्श्वभूमीवरच सुनील माने यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची औंध दौऱ्यात भेट घेत चर्चा केली आहे. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी तपशील जाहीर केला नाही. मात्र पक्ष प्रवेशाबाबतच्या चर्चेचे खंडनही केले नाही. दरम्यान, माने यांचे निकटवर्तीय आणि अजित पवार पक्षाचे सातारा जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांनीही या भेटीला आणि चर्चेला दुजोरा दिला.

रहिमतपूर पालिकेसाठी बांधणी

रहिमतपूर पालिकेच्या निवडणुकीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. निवडणुकीच्या अगोदर अजित पवार यांच्या पक्षात सहभागी झालो, तर अजित पवार यांच्या पाठिंब्यावर पंचवीस वर्षांची सत्ता कायम ठेवण्यास यश मिळेल अन्यथा कडवा संघर्ष करावा लागेल, अशी भीती कार्यकर्त्यांनी सुनील माने यांच्याजवळ व्यक्त केले आहे. पूर्वीची आणि सध्याची राजकीय परिस्थिती बदललेली आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीपूर्वी याबाबत निर्णय व्हावा अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी माने यांच्याकडे व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर सुनील माने यांनी औंध येथे अजित पवार यांची भेट घेतली. येत्या काही दिवसांत सुनील माने जाहीर कार्यक्रम घेणार असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असे माने यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.