Sharad Pawar : मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांमध्ये आणि सोलापूरमध्ये ओला दुष्काळ सदृश परिस्थिती पावसामुळे निर्माण झाली हे चित्र अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं. शेतकऱ्यांची पिकं तर वाहून गेलीच पण जमीनही खरडून गेली आहे. अशा परिस्थितीत शेतकरी खचला आहे. त्याला धीर देऊन उभं करत त्याला तातडीने मदत करण्याची गरज आहे असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांनी काही वेळापूर्वी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी शरद पवार यांनी ही मागणी केली.

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

महाराष्ट्रात जी अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतकरी, त्याची जमीन, त्याची पिकं यांचं अतोनात नुकसान झालं आहे. महाराष्ट्रात ऊस हे अत्यंत महत्त्वाचं पिक आहे. नांदेड, परभणी, जालना, धाराशिव, सोलापूर, बीड या भागांमध्ये उसाचं अतिशय नुकसान झालं आहे. काही ठिकाणी उस पडला, काही ठिकाणी वाहून गेला. त्याचा परिणाम खूप झाला आहे. किती नुकसान झालं आहे याचा आढावा घेण्याची गरज होती. त्याबाबतची चर्चा आम्ही केली आहे. १२ ऑक्टोबरला साखर कारखान्यांची बैठक बोलवली आहे. त्यामध्ये जे काही नुकसान झालं आहे त्यासंदर्भात राज्य आणि केंद्र सरकारशी कसा सुसंवाद साधावा याबाबत निर्णय होईल.

सरकारने तातडीने मदत केली पाहिजे अशी आमची मागणी-शरद पवार

आत्ता महाराष्ट्र सरकारने अधिक मदत केली पाहिजे अशी अपेक्षा आम्हाला आहे. आम्हाला आश्चर्य असं वाटतं की राज्य सरकारने ज्यांचं नुकसान झालं त्यांना मदत करण्याऐवजी उस उत्पादकांकडून एक मोठी रक्कम ही मुख्यमंत्री निधीसाठी घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. ज्यावेळी उस उत्पादकांना मदत देण्याची गरज आहे त्यावेळी त्याच्याकडून सक्तीने वसुली करणं हे चुकीचं आहे असंही शरद पवार म्हणाले. तसंच या निर्णयचा फेरविचार सरकारने केला पाहिजे असंही शरद पवार म्हणाले.

केंद्राकडून मदत मिळत नाहीये कारण..

शरद पवार पुढे म्हणाले, “आज शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, त्यांच्याकडूनच पैसे घेतले जाता कामा नये. केंद्राने मला सांगितलं की राज्य सरकारने आमच्याकडे फायनल प्रस्ताव दिलेला नाही. त्यामुळे मी त्यावर भाष्य करणार नाही. माझा आग्रह आहे की राज्य सरकार लवकरात लवकर प्रस्ताव द्यावा. मुख्यमंत्र्यांनी तातडीने संबंधितांशी बोलावं आणि हा निधी घेऊन त्याचं वाटप सुरु करावं. राज्य सरकारने तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. संपूर्ण राज्यात संकटांची स्थिती नाही. त्यामुळे ठराविक जिल्ह्यात लक्ष केंद्रीत करणं सरकारला शक्य होतं. अधिकारी कमी होती तर इतर जिल्ह्यांतले अधिकारी, कर्मचारी नेमावेत आणि त्यांनी लवकर मदत करावी.” असंही शरद पवार म्हणाले.