Sharad Pawar मला आठवतं मी त्यावेळी केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात होतो. पी. चिदंबरम हे माझे सहकारी होते. चिदंबरम यांनी पीएमएलए कायद्यातील तरतुदीत दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे म्हटलं होतं. मी त्याला विरोध दर्शवला होता असं शरद पवार यांनी सांगितलं. संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुंबईत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. जावेद अख्तर हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. त्या कार्यक्रमात शरद पवार यांनी हे भाष्य केलं.

काय म्हणाले शरद पवार?

“मी केंद्रीय मंत्रिमंडळात होतो, त्यावेळी पी. चिदंबरम हे माझे सहकारी होते. चिदंबरम यांनी कायद्यात दुरुस्ती केली पाहिजे तशी आवश्यकता आहे असा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या समोर आणला. तो प्रस्ताव वाचल्यानंतर मी त्यावेळी पंतप्रधान असलेल्या मनमोहन सिंग यांना सांगितलं की हा प्रस्ताव घातक आहे. हा प्रस्ताव मान्य होता कामा नये अशी भूमिका मी घेतली होती. उद्या राज्य बददलं तर आपण अडचणींत येऊ असं मी सांगितलं होतं. माझं ऐकलं नाही. दुरुस्ती केली गेली, त्यानंतर आपलं राज्य गेलं. सत्ता आल्यानंतर पहिली अटक ही चिदंबरम यांना करण्यात आली. सत्तेचा गैरवापर त्या ठिकाणी झाला. विशेषतः विरोधकांच्या अशा केसेस अधिक केल्या जातील अशी शंका माझ्यासारख्यांना होती” असं शरद पवार यांनी सांगितलं.

संजय राऊत यांना जशी अटक झाली तसे अनेकजण अटकेत-शरद पवार

संजय राऊत यांना अटक करण्यात आली. त्यांना १०० दिवस त्या ठिकाणी ठेवण्यात आलं. त्यामुळे आमच्यासह अनेकांना आता हे कळेल की तिथली स्थिती काय? ती स्थिती दुरुस्त करण्याचा विचार हा आज किंवा उद्या करावाच लागेल. तुरुंगातल्या आठवणी, अनेकांच्या भेटी गाठी, त्यांचे अनुभव हे लक्षात घ्यावं लागेल. एकनाथ खडसे हे आमचे सहकारी आहेत. त्यांचे जावई इंग्लंडमध्ये होते. टाटा कन्सल्टन्सी या संस्थेत जॉब करत होते. खडसेंच्या संदर्भात काहीतरी तक्रार आली तेव्हा त्यांचे जावई लंडनहून इथे आले, इथे आल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली. त्यांचा काहीही संबंध नव्हता. अनिल देशमुखांवर एका शासकीय अधिकाऱ्याने जी तक्रार केली होती ती १०० कोटींच्या भ्रष्टाचार केल्याचा आरोपाची होती. शेवटी न्यायालयात जी केस उभी राहिली तेव्हा १०० मधली दोन शून्य गेली आणि १ कोटींचा भ्रष्टाचार केला असा आरोप त्यांच्यावर झाला. आरोप करणारे जे अधिकारी होते की राज्य सरकारने त्यावेळी भ्रष्टाचाराच्या संदर्भात काही कारवाई केली नव्हती. अशी अनेक नावं आपल्याला सांगता येतील.

सत्ताधारी पुस्तक न वाचता कसं काय बोलतात?

मला एका गोष्टीची गंमत वाटली की त्या ठिकाणी त्रास होतो. पण ही सगळी मंडळी नमली नाहीत. संकटातून बाहेर कसं निघता येईल याचा विचार त्यांनी केला. संजय राऊत यांचं पुस्तक प्रसिद्ध होणार आहे ते दोन दिवस चर्चेत आहे. सत्ताधारी पक्षाच्या लोकांना पुस्तक न वाचता ते कसं काय समजलं माहीत नाही. प्रचंड टीका संजय राऊत आणि पुस्तक याच्यावर सुरु आहे. कुणी म्हणालं मी बालसाहित्य वाचत नाही, कुणी आणखी काय सांगितलं. अनेक मतं मांडली गेली. या पुस्तकात जी माहिती आहे त्यातून सत्तेचा गैरवापर कसा होतो त्याचं उत्तम लिखाण या पुस्तकाच्या माध्यमातून महाराष्ट्रा समोर आणलं आहे. यंत्रणा कशी वागते याचं लिखाण या पुस्तकात आहे असंही शरद पवार म्हणाले.