Sharad Pawar NCP : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं, तर महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का बसला. बहुमत मिळाल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी राज्यात सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरु केल्या आहेत. मात्र, आज आठ दिवस होऊनही राज्यात सरकार स्थापन झालेलं नाही. यासाठी महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठकांवर बैठका सुरु आहेत. पण अद्याप सरकारमधील मंत्रिपदाचा तोडगा निघालेला नाही. यातच मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? हे देखील स्पष्ट झालेलं नाही. यातच दुसरीकडे महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर आता आघाडीतील नेते कामाला लागले आहेत. तसेच पराभवाची कारणं आता नेत्यांकडून शोधण्यात येत आहेत.

या पार्श्वभूमीवरच आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या अपयशाबाबत चर्चा झाली. तसेच यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पाटील आणि आमदार उत्तम जानकर यांच्यावर मोठी जबाबादारी सोपण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा : शिंदेंच्या शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर; ‘आमच्या पक्षातील नेत्यांनी माझं काम केलं नाही’, ‘या’ आमदाराचा केंद्रीय मंत्र्यांवर आरोप

जयंत पाटील काय म्हणाले?

“आज पक्ष कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या गटनेते म्हणून जितेंद्र आव्हाड यांची निवड करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून रोहित आर आर पाटील यांची निवड करण्यात आली. तसेच प्रतोद म्हणून उत्तम जानकर यांची निवड करण्यात आली आहे”, अशी माहिती जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या आमदारांची मुंबईत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला बीडचे आमदार संदीप क्षीरसागर उपस्थित नव्हते. त्यामुळे संदीप क्षीरसागर हे बैठकीला का उपस्थित नव्हते? याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. पण आमदार संदीप क्षीरसागर हे का उपस्थित नव्हते, याबाबत जयंत पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघात काही नियोजित कार्यक्रम असल्याचं कारण सांगितलं.