कर्जत: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने जाहीर केलेले पॅकेज फसवे असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) “काळी दिवाळी” साजरी करून निषेध नोंदवला. कर्जत येथे प्रांताधिकारी कार्यालयासमोर आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. या वेळी सरसकट कर्जमाफी, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ७५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम, अतिवृष्टीग्रस्तांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याची मागणी करण्यात आली.

गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील ६० लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. मात्र सरकारकडून घोषित मदत शेतकऱ्यांच्या खर्चाच्या तुलनेत अत्यंत तुटपुंजी असल्याची टीका या वेळी आमदार पवार यांनी केली. सरकारने पॅकेजच्या नावाखाली अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. सरसकट कर्जमाफी आणि हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत देईपर्यंत आम्ही रस्त्यावर संघर्ष करत राहू, असा इशारा त्यांनी दिला.

कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली साडेआठ हजार रुपयांच्या मदतीचा केवळ काही शेतकऱ्यांनाच लाभ मिळणार असल्याने संताप व्यक्त करण्यात आला. याशिवाय रब्बी हंगामाच्या तयारीसाठी हेक्टरी १० हजार रुपयांची मदतही अपुरी असल्याचे मत या वेळी मांडण्यात आले.

सोयाबीन, कापूस, उडीद, तूर, ऊस आदी पिकांचे मोठे नुकसान झाले असताना, पंचनामे अद्याप पूर्ण न झाल्याने शेतकरी अडचणीत आहेत. बाजारात पिकांना हमीभावापेक्षाही कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक संकट अधिकच गडद झाले आहे. पशुधनाच्या मृत्यूसाठी सरकारकडून जाहीर करण्यात आलेली मदत बाजारभावाच्या तुलनेत अत्यल्प असल्याने जनावरांच्या नुकसानीचे खरे नुकसान भरून येत नसल्याची खंत आंदोलकांनी व्यक्त केली. प्रांताधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यभर हे आंदोलन करण्यात येत आहे. राज्य सरकारकडून अद्याप अतिवृष्टीग्रस्तांना मदत मिळण्यास सुरुवात झालेली नाही. ही मदत कधी मिळणार असाही बाधित शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. राज्य सरकारने सुरुवातीच्या काळात जाहीर केलेली मदत व प्रत्यक्षात निघणारे मदतीचे आदेश, यामध्ये तफावत दिसू लागली आहे. त्यामुळेही शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. झालेल्या नुकसानीचे अद्याप पंचनामेही पूर्ण झालेले नाहीत, अतिवृष्टीमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे ते शेतजमीन खरडून जाण्याचे. ही भरपाई कशी होणार, याकडे आंदोलनात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. या आंदोलनात कर्जत तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.