Sharad Pawar on Jayant Patil’s Request relieve from Post : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आज त्यांचा २६ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. या वर्धापन दिनानिमित्त पक्षाने पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याला संबोधित करताना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं. पाटील यांनी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे विनंती केली की त्यांना प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावं. तसेच आता नव्या चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे असंही सुचवलं. दरम्यान, पाटलांच्या भाषणानंतर शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार म्हणाले, “जयंत पाटील यांनी आत्ताच मला सांगितलं की आता नवीन पिढीला संधी द्या. तुम्ही-आम्ही सगळे मिळून त्यांच्या मागे उभे राहूया. त्यांनी जो विषय मांडला आहे त्यावर विचार करण्याची तयारी असली पाहिजे. तुमची (कार्यकर्त्यांची) मागणी वेगळी आहे असं इथे दिसलं. परंतु, मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की आपण सर्व प्रमुख सहकाऱ्यांना एकत्र करून यावर चर्चा करू. प्रमुख सहकाऱ्यांशी यावर सुसंवाद साधून सामूहिकपणे यावर निर्णय घेऊ. हा निर्णय घेताना प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात नवी पिढी दिसली पाहिजे, नवे चेहरे दिसलेच पाहिजेत. आपण ठिकठिकाणी नवे चेहरे उभे केले आहेत, त्यांना संधी देऊया.
जयंत पाटील काय म्हणाले होते?
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले, “मला शरद पवार यांनी आतापर्यंत अनेक संधी दिल्या आहे. सात वर्षांचा कालावधी दिला. पक्षाने आता नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे. मी तुमच्या सर्वांसमोर शरद पवार यांना एवढीच विनंती करेन… शेवटी हा पक्ष शरद पवारांचा आहे. त्यामुळे शरद पवार याबाबत निर्णय घेतील. आपल्याला पक्षाला बरंच पुढे न्यायचं आहे. आजवर मिळालेल्या संधीसाठी मी शरद पवारांचा आभारी आहे”.
शरद पवार काय म्हणाले?
जयंत पाटील यांनी शरद पवारांकडे विनंती केल्यानंतर शरद पवारांनी आपल्या भाषणादरम्यान त्यावर भाष्य केलं. ते म्हणाले, आम्ही सर्व नेत्यांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेऊ. आपल्या पक्षात अनेक कर्तृत्ववान कार्यकर्ते-पदाधिकारी आहेत. त्यांना संधी देऊ, प्रतीष्ठा देऊ. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत. पुढील तीन महिने सर्वांनी याकडेच लक्ष द्यावं. येत्या तीन महिन्यांत निवडणुकीनंतर आपण पुन्हा भेटणार आहोत.