“निवडणूक गांभीर्याने घ्यायला हवी होती”, साताऱ्यातील पराभवानंतर शरद पवारांनी टोचले शशिकांत शिंदेंचे कान!

सातारा जिल्हा बँक निवडणुकीत शशिकांत शिंदेंचा पराभव झाल्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषदेत बोलताना त्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

Sharad-Pawar-PTI
(प्रातिनिधिक छायाचित्र)

नुकत्याच लागलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांना पराभवाचा धक्का बसला आहे. त्यांच्यापाठोपाठ गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांना देखील पराभव पत्करावा लागला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात असल्याचं बोललं जात आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात जाऊन शशिकांत शिंदे यांची भेट घेतल्यामुळे पक्षानं हा पराभव किती गांभीर्याने घेतला आहे, याचीच प्रचिती आली. मात्र, त्याच गांभीर्याने शशिकांत शिंदेंनी ही निवडणूक न घेतल्याची नाराजी शरद पवार यांनी या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे.

शशिकांत शिंदे यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीतीलच ज्ञानदेव रांजणे हे जेमतेम ताकद असलेले उमेदवार उभे होते. मात्र त्यांना जिल्ह्यातील आणि राज्य पातळीवरील नेत्यांचा छुपा पाठिंबा असल्याचे उघडपणे बोलले जात होते. तसेच भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, त्यांचे बंधू खासदार उदयनराजे भोसले यांचाही आशीर्वाद त्यांना होता. यातूनच ही लढत अत्यंत चुरशीची होत अखेर केवळ एका मताने शिंदे यांचा आज पराभव झाला. पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेल्या शिंदे यांचा विधानसभेपाठोपाठ हा सलग दुसरा मोठा पराभव आहे. त्यांचा पराभव होताच त्यांच्या समर्थकांनी साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्याच कार्यालयावर दगडफेक करत जोरदार हल्ला चढवला. तसेच पक्षाच्याच जिल्हा तसेच राज्य पातळीवरील नेत्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

या प्रकारामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरू असल्याची जोरदार चर्चा साताऱ्याच्या राजकीय वातावरणात सुरू झाली. त्यामुळे या निकालांचा पक्षावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेताच खुद्द शरद पवारांनी साताऱ्यात जाऊन शशिकांत शिंदेंची भेट घेतल्याचं बोललं जात आहे.

Satara District Bank Election Results: महाविकास आघाडीने उडवला विजयी गुलाल, २१ पैकी १७ जागा जिंकल्या; भाजपाचा दारुण पराभव

शशिकांत शिंदेंची भेट घेतल्यानंतर शरद पवारांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी शिंदेंना सूचक शब्दांमध्ये सुनावलं आहे. “सहकारी बँकांच्या निवडणुकीत शशिकांत शिंदेंचा पराभव झाला. पण मला वाटतं की शिंदेंनी ही निवडणूक अधिक गांभीर्याने घ्यायला हवी होती”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sharad pawar on shashikant shinde defeat satara district bank election results pmw

Next Story
‘बुद्धिस्ट सर्किट’ विकासातून पर्यटनास चालना
ताज्या बातम्या