गेल्या वर्षी जून २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडून दोन गट तयार झाले. अजित पवार यांनी पक्षातील ४२ आमदारांना आपल्याबरोबर घेत वेगळा गट बनवला. या गटासह ते भाजपा आणि शिवसेनेच्या (शिंदे गट) युतीत सहभागी झाले. तसेच अजित पवार यांच्या गटाने आपणच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा दावा केला. यावरून दोन्ही गटांमध्ये वाद झाला आणि हा वाद निवडणूक आयोगाकडे गेला. त्यानंतर निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या गटालाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निकाल दिला. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ‘घड्याळ’ हे निवडणूक चिन्ह देखील अजित पवारांच्या गटाला बहाल करण्यात आलं.

शरद पवार यांनी नुकतीच ‘लोकसत्ता’ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत ते म्हणाले, “प्रफुल्ल पटेल हे २००४ सालापासूनच, किंबहुना त्या वर्षीच्या निवडणुकीच्या आधीपासूनच मला सतत येऊन म्हणायचे की, आपण भाजपात जाऊया. ते नेहमी म्हणायचे, यंदाच्या निवडणुकीत आपला पक्ष टिकणार नाही. देशात अटल बिहारी वाजपेयी यांना आता पर्याय नाही. त्यामुळे आपण सर्वजण भाजपात जाऊया. पटेल माझ्याकडे येऊन तासनतास आग्रह करत बसायचे. शेवटी मी त्यांना स्पष्टपणे नाही म्हणून सांगितलं. त्यानंतरही ते थांबले नाहीत. मग मी त्यांना सांगितलं की, हवं तर तुम्ही भाजपात जा. अखेर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं.”

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जून २०२३ मध्ये फूट पडली असली तरी याआधी देखील हा पक्ष फुटण्याच्या मार्गावर होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवारांनी काही आमदारांना आपल्याबरोबर घेत भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देत राज्यात सरकार स्थापन केलं होतं. मात्र हे सरकार केवळ दोन दिवस टिकलं. त्यानंतर अजित पवार माघारी फिरले. अजित पवार आणि त्यांच्या गटातील नेत्यांनी अनेकदा दावा केला आहे की शरद पवार हे २०१४ सालीच भाजपाबरोबर सरकार स्थापन करणार होते. दरम्यान, शरद पवार यांनी म्हटलं आहे की, “आमच्या पक्षातील प्रफुल्ल पटेल हे २००४ सालापासूनच भजपाबरोबर युती करण्यासाठी माझ्या मागे लागले होते.”

हे ही वाचा >> “२०१९ मध्ये शिंदेच मुख्यमंत्री झाले असते, पण…”, राऊतांनी सांगितल्या आतल्या घडामोडी; फडणवीस-तटकरेंचा उल्लेख करत म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मुलाखतीवेळी शरद पवार यांनी आणखी एका महत्त्वाच्या प्रश्नावर उत्तर दिलं. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्त आमदार असूनही मुख्यंमत्रिपद का नाकारलं? यावरही शरद पवार यांनी भाष्य केलं. पवार म्हणाले, “आम्हाला मुख्यमंत्रिपद मिळाल्यानंतर ते कोण चालवणार? याचा विचार आम्ही करत होतो. अजित पवारांचं नाव तेव्हा चर्चेत नव्हतं. कारण अजित पवार तेव्हा अनुभवाने नवखे होते. तेव्हा छगन भुजबळांसारखी आणखीही काही नावं आमच्या चर्चेत होती. मात्र त्यांची निवड केली असती तर पक्ष एकत्र राहिला नसता. लगेच नाही, मात्र नंतरच्या काळात पक्षात फूट पडली असती. त्यामुळे राज्याला स्थिर सरकार देण्यात आम्ही अपयशी ठरलो असतो. त्यामुळे आम्ही एकमताने मुख्यमंत्रिपद काँग्रेसला देऊन अधिकची मंत्रिपदं घेण्याचा निर्णय घेतला.”