महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या महिन्यात मोठा राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी पक्षाशी बंडखोरी केली. पक्षातील अनेक आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना बरोबर घेत त्यांनी वेगळ गट बनवला. या गटाने नंतर थेट आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा दावा केला. तसेच ते भाजपाप्रणित महायुतीत आणि राज्याच्या सत्तेत सहभागी झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्याचं, पक्षात दोन गट असल्याचं चित्र जनतेला दिसत असलं तरी दोन्ही गटाचे नेते जनतेला गोंधळात टाकणारी वक्तव्ये करत आहेत.

दरम्यान, अजित पवार गटाने पुन्हा एकदा पक्षावर, पक्षचिन्हावर आणि पक्षाच्या अध्यक्षपदावर दावा केला आहे. आपणच या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचं अजित पवार यांनी नुकतंच म्हटलं आहे. तर शरद पवार यांनीही आपणच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि जयंत पाटील हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असल्याचं ठामपणे सांगितलं आहे. दोन्ही गटांमधील वाद वाढत असतानाच आज महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीतून शरद पवार यांनी अजित पवार गटाला इशारा दिला आहे

इंडिया आघाडीची गुरुवारी आणि शुक्रवारी (३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर) मुबईत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला देशभरातील २८ पक्षांचे नेते, सहा राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत. महाविकास आघाडीने या बैठकीचं आयोजन केलं आहे. मुंबईतल्या ग्रँड हयात या हॉटेलमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांची ही बैठक होणार आहे. महाविकास आघाडीतल्या प्रमुख नेत्यांनी आज या बैठकीच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर सर्व प्रमुख नेत्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर महाविकास आघाडीचे नेते पत्रकार परिषदेला सामोरे गेले. या पत्रकार परिषदेला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. तर काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार बाळासाहेब थोरात उपस्थित होते.

हे ही वाचा >> Chandrayaan 3 : तू तिकडे बघ मी फोटो काढतो! ‘प्रज्ञान’ने ‘विक्रम’चं चंद्रावर केलेलं फोटोशूट पाहून व्हाल खूश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पत्रकार परिषदेत शरद पवार यांना विचारण्यात आलं की, तुमचे काही सहकारी (अजित पवार गट) भाजपाबरोबर गेले आहेत आणि तुम्ही विरोधात आहात, त्यामुळे तुमच्या भूमिकेविषयी संभ्रम असल्याचं बोललं जात आहे, त्यावर तुम्ही काय सांगाल? या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले, महाविकास आघाडीत अजिबात संभ्रम नाही. मतदार त्या लोकांना त्यांची जागा दाखवतील, उद्या निवडणुकीत या राज्यातले मतदार त्यांना त्यांची जागा दाखवतील. आमच्या भूमिकेविषयी सगळ्या हितचिंतकांमध्ये स्पष्टता आहे.