गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व पक्षाच्या सर्वोच्च वर्तुळातील नेते चर्चेत आले आहेत. आधी सुप्रिया सुळेंनी ‘अजित पवार पक्षाचे नेते’ असल्याचं केलेलं वक्तव्य, त्यावर शरद पवारांनी आधी केलेलं समर्थन व नंतर केलेलं घुमजाव आणि त्यापाठोपाठ शरद पवारांचा सातारा-कोल्हापूर दौरा यामुळे पक्षातील घडामोडींची राजकीय वर्तुळात चर्चा होताना पाहायला मिळत आहे. शरद पवारांच्या कोल्हापुरातील सभेसंदर्भात बोलताना हसन मुश्रीफांनी खोचक टीका केल्यानंतर आता त्यावर खुद्द शरद पवारांनी मुश्रीफांना सुनावलं आहे.

काय म्हणाले हसन मुश्रीफ?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटासोबत गेलेले हसन मुश्रीफ यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना शरद पवार यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं. “शरद पवार नेते आहेत. त्यांची विचारधारा, त्यांचे विषय, त्यांचा मी सन्मान करतो. पण भावना लक्षात घेतली पाहिजे. जानेवारीत माझ्यावर पहिल्यांदा ईडीचा छापा पडला. आम्ही न्यायालयातच लढा दिला. अनेक लोकांवर जेव्हा कारवाया झाल्या, तेव्हा सहानुभूती, मदत झाली. पण माझ्याबाबतीत तसं काही झालं नाही. ठीक आहे. आम्ही आमच्या समस्या सोडवू”, असं हसन मुश्रीफ म्हणाले.

“कापशीची चप्पल बसली की कळेल त्याला”, जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ विधानावर हसन मुश्रीफांचा टोला!

“२०१४ ला भाजपाला पाठिंबा दिला तेव्हा ईडी होती का? २०१७ला होती का? २०१९ला होती का? २०२२-२३ ला आम्ही सह्या केल्या तेव्हाही ईडी नव्हती. जेव्हा ४५ आमदार एकत्र येतात, तेव्हा सगळ्यांमागे ईडी आहे का? हा सामुहिक निर्णय आहे”, असंही हसन मुश्रीफ यावेळी म्हणाले.

शरद पवारांची संतप्त प्रतिक्रिया

दरम्यान, ईडीचे छापे पडले तेव्हा पक्षाकडून सहकार्य झालं नाही या मुश्रीफ यांच्या दाव्याबाबत पत्रकार परिषदेत शरद पवारांना पत्रकारांनी विचारणा केली असता त्यावर पवारांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. “पक्षानं काय करायचं? तुमच्या घरी छापा पडला तर पक्ष काय करू शकतो? यात पक्षाला हस्तक्षेप करता येत नाही. आम्ही कुणाच्याच बाबतीत हस्तक्षेप केला नाही. अनिल देशमुख तुरुंगात गेले. संजय राऊत तुरुंगात गेले. नवाब मलिक गेले. त्यामुळे आमच्यातल्या काही लोकांना तुरुंगात जावं लागलं. पण जे गेले नाहीत, ते भाष्य करत आहेत”, असं शरद पवार म्हणाले.

“बच्चू कडू कोण बाबा?” शरद पवारांचा पत्रकार परिषदेत सवाल, ‘त्या’ विधानावरून टोला; म्हणाले, “गल्लीबोळातल्या…!”

“त्यांची (हसन मुश्रीफ) सुटका कशी झाली हे मला माहिती नाही. त्यांनी कुणाशी सुसंवाद साधला हे मला माहिती नाही. ज्या अर्थी त्यांच्यावर आधी कारवाई झाल्याचं आम्ही वाचलं आणि नंतर पुढची कारवाई थांबली याचा अर्थ काहीतरी सुसंवाद झाल्याचं दिसतंय”, असंही पवार म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

५३ आमदारांचं पत्र आणि शरद पवारांचं उत्तर

दरम्यान, शिंदेगट गुवाहाटीला गेला तेव्हाच राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांसह ५३ आमदारांनी शरद पवारांना सत्तेत सहभागी होण्याची परवानगी मागितली होती, असं हसन मुश्रीफ म्हणाले. यासंदर्भात बोलताना शरद पवारांनी त्यावर टीका केली. “५३ असो वा १०० असो.. तुम्ही मतं कुणाच्या नावावर मागितली? मतं भाजपाच्या नावाने मागितली का? कुणाच्याबरोबर जायचं म्हणतायत? भाजपाबरोबर? भाजपाच्या विरुद्ध आम्ही निवडणुका लढल्या. आम्ही लोकांना भाजपाला मतं द्यायला सांगितलं नाही. मग लोकांनी आम्हाला तशी मतं दिल्यानंतर मतदारांना फसवणं हे माझ्या चौकटीत बसत नाही. त्यांनी दिलेलं पत्र म्हणजे काही निर्णय होत नाही”, असं शरद पवारांनी नमूद केलं.