राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांनी पुकारलेले बंड शमवण्यासाठी पक्षाच्या सर्वच प्रमुख नेत्यांची धावपळ सुरु आहे. पक्षाचे आमदार फुटू नयेत यासाठी वेगवेगळया उपायोजना केल्या जात आहेत. अजित पवारांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा कसोटीचा काळ असून हे सर्व घडत असताना एक चेहरा मात्र गायब आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल या सर्व घडामोडींमध्ये कुठे दिसलेले नाहीत. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
प्रफुल्ल पटेल हे शरद पवारांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. महत्वाच्या बैठकांमध्ये ते नेहमीच पवारांच्या शेजारी दिसतात. पण सध्या प्रफुल्ल पटेल मात्र गायब झाले आहेत. एरवी सोशल मीडियावर सक्रीय असणारे प्रफुल्ल पटेल यांचे टि्वटर अकाऊंटही शांत आहे. आज सकाळी त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादनाचे टि्वट केले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसमधील सध्याच्या घडामोडींवर भाष्य करण्याचे त्यांनी टाळले आहे.
शनिवार-रविवार दोन दिवस दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, सुनिल तटकरे आणि जयंत पाटील या नेत्यांचे अजित पवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरले. राजकीय वाटाघाटी करताना शरद पवार मोठया प्रमाणात प्रफुल्ल पटेल यांच्यावर अवलंबून असतात. पण सध्याच्या राजकीय चित्रामध्ये पटेल कुठे दिसत नाहीयत.
एअर इंडिया घोटाळा प्रकरणात पटेल यांची चौकशी सुरु आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांचा रोष टाळण्यासाठी प्रफुल्ल पटेल फारसे सक्रीय दिसलेले नाहीत असे राष्ट्रवादीमधील सूत्रांचे मत आहे. शरद पवारांनी सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत मग अशा परिस्थितीत आणखी कोणाची गरजच काय? असा सवाल राष्ट्रवादीतील दुसऱ्या नेत्यांना विचारला.