अहिल्यानगर: शहरासह जिल्ह्यात शारदीय नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात आज, सोमवारपासून सुरुवात झाली. या निमित्ताने ठिकठिकाणची देवी मंदिरे रोषणाईने, आकर्षक सजावटी करून सुशोभित करण्यात आली आहेत. नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक तरुण मंडळानीही मंडप टाकून देवीमूर्तीची वाजतगाजत प्रतिष्ठापना केली. मंडपाचा परिसर कमानी, झालरींनी सजवण्यात आला आहे.

मोहटादेवी मंदिरात (पाथर्डी) देवस्थानाचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश महेश लोणे यांच्या उपस्थितीत, दिवाणी न्यायाधीश रविकिरण सपाटे यांनी सपत्नीक महाभिषेक करून घटस्थापना केली. देवस्थानचे विश्वस्त विक्रम वाडेकर, बाळासाहेब दहिफळे, शशिकांत दहिफळे, विठ्ठल कुटे, अक्षय गोसावी, कल्याण बडे, डॉ. श्रीधर देशमुख, देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे आदी उपस्थित होते. पौरोहित्य भूषण साखरे, भास्कर देशपांडे, बाळासाहेब क्षीरसागर यांनी केले. तत्पूर्वी मोहटादेवीच्या सुवर्ण मुखवट्याची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. मंदिर गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. काल व आज असे दोन दिवस आपापल्या गावी ज्योत घेऊन जाण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक गडावर दाखल झाले होते.

नगरकरांची ग्रामदेवी केडगाव येथील रेणुकामाता मंदिरात प्रवीण कोतकर व ज्योती कोतकर, तसेच विजय सुंबे व मोहिनी सुंबे यांच्या हस्ते विधिवत पूजा व महाआरती करून घटस्थापना करण्यात आली. बुऱ्हाणनगर येथील पुरातन कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी मंदिरात मुख्य पुजारी विजय भगत, दुर्गा भगत, अभिषेक भगत, कुणाल भगत यांच्या हस्ते विधिवत घटस्थापना करून देवीची महाआरती करण्यात आली.

सबजेल चौकातील तुळजाभवानीमाता मंदिर, शनी गल्लीतील भक्तांची देवी मंदिर अशा विविध ठिकाणी भाविकांनी पाऊस असूनही पहिल्या दिवसापासूनच गर्दी केली होती. कोल्हार येथील भगवतीमाता, राशीनची यमाई देवी महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर कळसुबाई गडावरील देवी, अशा विविध ठिकाणी भाविकांनी ‘आईराजा उदो उदो’च्या जयघोषात गर्दी केली होती.

मंदिरांच्या व्यवस्थापनाने परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. खेळणी, खाद्यपदार्थांचे स्टॉल परिसरातील रस्त्यांच्या दुतर्फा लावण्यात आले आहेत. पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. भाविकांना व्यवस्थित देवीचे दर्शन घेता यावे यासाठी बॅरिकेड उभारून दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर स्वतंत्रपणे मुखदर्शनाची व्यवस्थाही ठिकठिकाणी करण्यात आली आहे. दरम्यान आज सायंकाळी नगर शहर व परिसराला पावसाने पुन्हा झोडपून काढल्याने दर्शनासाठी बाहेर पडलेल्या भाविकांना अडकून पडावे लागले.