संजय राऊत हे सातत्याने एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह गेलेल्या ४० आमदारांवर टीका करताना दिसत आहेत. आजही त्यांनी एकनाथ शिंदे हे भाजपाचे मांडलिक झाल्याची टीका केली आहे. तसंच त्यांचे नेते कोण बाळासाहेब ठाकरे की अमित शाह हे त्यांनी सांगावं असंही म्हटलं आहे. तसंच त्यांची शिवसेना ही डुप्लिकेट शिवसेना आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यावर आता शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रेंनी प्रतिक्रिया दिली आहे. थुकरट प्रवक्ते असा संजय राऊत यांचा उल्लेख केला आहे.
शीतल म्हात्रेंचं ट्वीट काय आहे?
“सिल्व्हर ओकची चाकरी करणाऱ्या पायपुसण्याने खुर्चीकरिता सोनियांच्या दारी मुजरा करणाऱ्या पहिल्या ठाकरे पिता-पुत्रासंदर्भात आधी स्पष्टीकरण द्यावे आणि मग दुसर्यांवर टीका करावी… राजकारणासाठी बाळासाहेबांचं नाव घ्यायचं आणि सामनातून त्यांचे फोटो वगळायचे हीच थुकरट प्रवक्त्यांची नीती!!!” असं म्हणत शीतल म्हात्रेंनी ट्वीट करत टीका केली आहे.
संजय राऊत यांनी काय टीका केली होती?
शिवसेनेला कधी दिल्ली वाऱ्या कराव्या लागत नाहीत. मात्र ही नकली शिवसेना आहे. महाराष्ट्रात जर खरंच महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल, तर तो विस्तारासाठी दिल्लीत परवानगी घ्यायला कशाला जाईल? बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरे दिल्लीत अर्ज घेऊन उभे राहिले नाहीत. तुमचे नेते कोण ते एकदा सांगा. डुप्लिकेट शिवसेनेनं त्यांचा नेता कोण आहे हे सांगावं. बाळासाहेब ठाकरे की मोदी-शाह? फडणवीस तिथे गेले तर मान्य करतो. त्यांचा मक्का-मदिना दिल्लीत आहे. तुमचं काय आहे? तुम्ही दिल्लीत का धावताय? हे उठसूट दिल्लीत विचारायला जातात, आता काय कराययचं? आता काय निर्णय घेऊ? कुणाला कोणतं पद देऊ? ही आहे का तुमची शिवसेना? ही मांडलिक शिवसेना आहे. ही गुलामी आहे. ही महाराष्ट्राची शिवसेना नाहीये”, अशा शब्दांत संजय राऊतांनी एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर टीका केली होती. त्यानंतर आता शीतल म्हात्रेंनी टीका केली आहे.