शिवसेनेतील बंडखोरीनंतर बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा विषय सर्वोच्च न्यायालयातून आता विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात आला आहे. मात्र, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अपात्रता सुनावणीला दिरंगाई करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घाना दौऱ्यावर जात असल्याचा आरोप केला. तसेच सुनावणीच्या वेळापत्रकावरही आक्षेप घेतला. यावर आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली. ते शुक्रवारी (२९ सप्टेंबर) टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.
संजय गायकवाड म्हणाले, “कुठलाही निर्णय देण्यावर कुठलंही कोर्ट मर्यादा घालू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयानेही वर्षभर या प्रकरणावर सुनावणी घेतली. त्यांनीही वेळेचं बंधन पाळलं नाही. सर्वोच्च न्यायालयाला हे अधिकार आपले नाहीत हे माहिती होतं, मग त्यांनी एक वर्ष वेळ का घालवला. त्यांनी पहिल्याच दिवशी हे प्रकरण आमच्या अधिकारात येत नाही म्हणून फेकून द्यायला हवं होतं.”
हेही वाचा : “४ महिने उलट तपासणी, ४ महिने साक्ष अन् आठवड्यातून दोनदाच…”, परबांनी सांगितला नार्वेकरांचा ‘तो’ डावपेच
“प्रत्येकाला कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ तर लागणारच”
“कायद्यानुसार प्रत्येकाला संधी द्यावी लागते. त्याचं मत मांडू द्यावं लागतं. हे प्रकरण काही एका व्यक्तीचं नाही. ठाकरे गटाचे १४-१५ आमदार आणि शिंदे गटातील ४०-५० आमदार आहेत. प्रत्येकाची बाजू ऐकण्यासाठी, प्रत्येकाला कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ तर लागणारच आहे,” असं मत संजय गायकवाड यांनी व्यक्त केलं.