काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ठाकरे सेनेला मांडीवर घेतलं आहे अशी टीका शंभूराज देसाई यांनी केली आहे. राष्ट्रवादीने ठाकरे सेनेला दत्तक घेतल्यासारखं आहे असाही टोला त्यांनी लगावला आहे. ‘टीव्ही ९’ शी बोलताना शंभूराज देसाई यांनी संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाला, नातवाला दुसरा आधार शोधावा लागतो ही शोकांतिका आहे अशी टीकाही त्यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिशा सालियन प्रकरणात खोटी कागदपत्रं सादर केल्याने नाना पटोले सभागृहात हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले “ज्यावेळी या प्रकरणाची चर्चा सभागृहात सुरु होती तेव्हा गृहमंत्री, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी तपासात नव्याने समोर आलेली माहिती दिली होती. याची पुन्हा चौकशी होणार असेल तर नव्या आणि जुन्या बाबींचाही तपास होईल. पण सत्यता तपासण्याआधीच नाना पटोले कोणत्या आधारे ही माहिती खोटी आहे सांगत आहेत. ज्यांना सत्यता पडताळण्याचा अधिकार आहे त्यांचा अहवाल येऊ दे. यानंतर नाना पटोले यांनी सभागृहात काय मांडायचं, काय नाही याचा विचार करावा”. पूर्वीच्या तपासात काही गोष्टी समोर आल्या नव्हत्या की जाणुनबुजून आणल्या नव्हत्या हे चौकशीत समोर येईल असंही ते म्हणाले.

“ठाण्यातील बिल्डर सुरज परमार यांच्या ‘सुसाईड नोट’मध्ये असलेली नावं…”, संजय राऊतांकडून एसआयटी चौकशीची मागणी

संजय राऊत यांनी ठाण्यातील बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. यावर बोलताना ते म्हणाले की “ठाकरे सेनेला एका मांडींवर काँग्रेसने आणि दुसऱ्या मांडीवर राष्ट्रवादीने बसवलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ठाकरे दत्तक घेतलं आहे. जयंत पाटील माध्यमांसमोर उघडपणे राष्ट्रवादी काँग्रेसची शिवसेना असल्याचं म्हणतात. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने यांना दत्तक घेतल्यासारखं आहे”.

“ज्या बाळासाहेब ठाकरेंचं नाव ठाकरे सेनेच्या पाठीशी आहे त्यांचा आधार समाजाला, इतर पक्षांना होता. पण आता त्यांच्या मुलाला, नातवाला आपलं वागणं आणि धोरणामुळे दुसरा आधार शोधावा लागतो ही शोकांतिका आहे,” अशी टीका यावेळी त्यांनी केली.

“तुमचेच तीन पक्ष चिखलफेक करत आहेत. तुम्हाला सभागृहात धोरणं, राजकीय विषयांवर चर्चा करायची असेल, राज्याच्या हिताचे प्रश्न मांडायचे असतील, सरकारकडून काही सकारात्मक आश्वासन हवं असेल, विदर्भाला न्याय द्यायचा असेल तर चर्चेत सहभागी व्हा. पण तुम्हाला विदर्भाबद्दल किती आस्था आहे हे दिसत आहे. शिंदे, फडणवीस रोज त्यावर चर्चा करत आहेत. पण विदर्भाच्या प्रश्नावर हे चर्चेत सहभागी झाले नाहीत. कोणत्याही विषयाचं महत्त्व आम्ही कमी केलं नाही. सर्व प्रश्नांना आम्ही समाधानाकारक उत्तरं दिली आहेत,” असं शंभूराज देसाईंनी सांगितलं.

“आधिवेशन संपल्यावरही राऊत रोज सकाळी टीव्हीवर दिसणारच आहे. मधला साडे तीन महिन्याचा आराम केल्याचा कालावधी सोडला तर ते रोजच टीव्हीवर आहेत. आम्ही आमचं काम करु, राऊतांनी नेहमीप्रमाणे सकाळी बोलावं. लोक एका कानाने ऐकतात आणि दुसऱ्या कानाने सोडून देतात,” अशी टीका त्यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shinde faction mla shambhuraj desai on shivsena sanjay raut uddhav thackeray sgy
First published on: 25-12-2022 at 11:59 IST