scorecardresearch

‘खरी शिवसेना’ वाद आता निवडणूक आयोगासमोर : सुनावणीबद्दल CM शिंदेचं मोठं विधान; म्हणाले, “जो काही निर्णय होईल तो…”

शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदेंचं विधान

‘खरी शिवसेना’ वाद आता निवडणूक आयोगासमोर : सुनावणीबद्दल CM शिंदेचं मोठं विधान; म्हणाले, “जो काही निर्णय होईल तो…”
मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केलं विधान

शिवसेना कोणाची या मुद्द्यावर केंद्रीय निवडणूक आयोगापुढील सुनावणीस सर्वोच्च न्यायालयातील पाच सदस्यीय घटनापीठाने हिरवा कंदील दाखवल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोगासमोरील सुनावणीसंदर्भात भाष्य केलं आहे. शिवसेनेचे पहिले आमदार दिवंगत वामनराव महाडीक यांच्या सुकन्या हेमांगी वामनराव महाडीक यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी त्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला. यानिमित्ताने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदेंना निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला. या प्रश्नावर उत्तर देताना शिंदेंनी पुन्हा एकदा बहुमताचा उल्लेख केला.

नक्की वाचा >> Thackeray vs Shinde: उद्धव ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयाने धक्का दिल्यानंतर उज्ज्वल निकम म्हणाले, “आजच्या निकालामध्ये…”

हेमांगी यांनी शिंदेंना पाठिंबा जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांचा सत्कार केला. त्यानंतर शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या अगोदरही अनेक नेत्यांनी व लोकांनी मला पाठिंबा दिला आहे. बाळासाहेब ठाकरे यांची सावली असलेले थापासुद्धा मला पाठिंबा द्यायला आले. त्यांनीसुद्धा भावना व्यक्त केली की, आम्ही म्हणजे शिंदे गट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तसेच हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जात आहे, असं सांगितलं. हेमांगी यांनीही समाजाची सेवा करायची असल्याने आपण हा पाठिंबा देत असून आपली कोणतीही राजकीय अपेक्षा नसल्याचं सांगितलं आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी आवर्जून नमूद केलं. अशा लाखो लोकांचा आम्हाला पाठिंबा आहे. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करू.आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन राज्याचा विकास करू व राज्यातील प्रत्येक समाज घटकाला न्याय देण्याचं काम करू, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

नक्की वाचा >> Thackeray vs Shinde: “..तर ते डायरेक्ट अपात्र ठरले असते”; शिंदे गटाबद्दल बोलताना ‘त्या’ पत्राचा उल्लेख करत उज्ज्वल निकम यांचं विधान

यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांना सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगासमोरील सुनावणीसंदर्भातील मार्ग मोकळा करुन दिल्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला. केंद्रीय निवडणूक आयोगासमोरील सुनावणीसंदर्भात आपली कशी तयारी सुरु आहे? असं पत्रकाराने मुख्यमंत्र्यांना विचारलं. यावर उत्तर देताना शिंदे यांनी, “केंद्रीय निवडणूक आयोग मेरिटप्रमाणे निर्णय घेईल. लोकशाहीमध्ये बहुमताला खूप महत्त्व असतं हे आपल्याला ठाऊक आहे. सर्वोच्च न्यायालयाने जो काही निकाल दिला आहे त्याचं मी आधीच स्वागत केलं आहे. (निवडणूक आयोगासमोर) जो काही निर्णय होईल तो नियम, निकष आणि मेरिट या सर्वाचा विचार करुनच होईल,” असं मत व्यक्त केलं.

नक्की वाचा >> Thackeray vs Shinde: उद्धव ठाकरेंनी CM पदाचा राजीनामा दिल्याचा शिंदे गटाला होणार फायदा?; सर्वोच्च न्यायालयात उपस्थित झाला मुद्दा

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पहिली प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी, “देशात राज्यघटना आणि कायद्यांच्या आधारे निर्णय होतात. निवडणूक आयोगही घटनात्मक संस्था आहे,” असं म्हटलं होतं. तसेच, “सर्वोच्च न्यायालयाने सर्व बाबींचा विचार करून आयोगापुढील सुनावणीस स्थगिती देण्याची मागणी फेटाळली आहे. लोकशाहीत हेच अपेक्षित होते. आम्ही कोणतीही कृती राज्यघटना किंवा कायदेशीर तरतुदींविरोधात केलेली नाही,” असंही शिंदेंनी अधोरेखित केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-09-2022 at 08:03 IST

संबंधित बातम्या