‘राष्ट्रवादीने परभणी जिल्ह्यास सगळे दिले. पण जिल्ह्यातून पक्षाचा आमदार-खासदार का मिळत नाही,’ अशी तक्रार निवडणूक प्रचारासाठी जिल्ह्य़ात येणारे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जाहीर सभेत सातत्याने करीत.
आता विजय भांबळे व डॉ. मधुसूदन केंद्रे यांच्या विजयामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या पदरात निम्मे यश पडले आहे. लोकसभेतील पराभवाने खचून न जाता विधानसभेच्या मैदानात मात्र पूर्ण ताकदीने उतरून भांबळे यांनी रामप्रसाद बोर्डीकर यांच्यासारख्या दिग्गज सत्ताधाऱ्याला अस्मान दाखवले.
गंगाखेडमध्ये मागील वेळी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवलेल्या डॉ. केंद्रे यांचा पराभव झाला होता. या वेळी मात्र त्यांनी दणदणीत विजय मिळवला. धनशक्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या या मतदारसंघात  पसेवाटप प्रकरणाने चच्रेत आलेल्या व अटकही झालेल्या सीताराम घनदाट, उद्योजक रत्नाकर गुट्टे या दोघांचा केंद्रे यांनी पराभव केला. एका अर्थाने भांबळे व केंद्रे ‘बाजीगर’ ठरले.
गेल्या १५ वर्षांपासून भांबळे यांची बोर्डीकरांशी कडवी झुंज सुरू होती. सुरुवातीला २००४च्या निवडणुकीत ते पराभूत झाले. २००९मध्ये भांबळे अपक्ष म्हणून पुन्हा बोर्डीकरांविरोधात उभे राहिले. बोर्डीकर येथून तीन वेळा विजय संपादन केलेले मातब्बर नेते, तर भांबळे त्यांच्यासमोर नवखे व अपक्ष. मागील वेळी भांबळे यांचा निसटता पराभव झाला. त्यानंतर राष्ट्रवादीने भांबळेंना जिल्हाध्यक्षपद दिले. बोर्डीकर या वेळी पाचव्यांदा आमदार होण्यासाठी भवितव्य अजमावत होते, तर भांबळे तिसऱ्यांदा कौल घेत होते. आघाडी तुटल्याने त्यांना राष्ट्रवादीचे घडय़ाळ चिन्ह मिळाले. अवघ्या ४ महिन्यांपूर्वी भांबळे यांचा लोकसभेत सेनेच्या संजय जाधव यांच्याकडून पराभव झाला. यात मोदी लाटेचा करिष्मा होताच.  पण बोर्डीकर, सुरेश वरपूडकर, सीताराम घनदाट यांनी पक्षनिरपेक्ष आघाडी करून भांबळे यांच्या मार्गात काटे अंथरले. चार महिन्यांपूर्वीच्या पराभवानंतर भांबळे पुन्हा जोमाने कामाला लागले. त्याचे फळ त्यांना या निवडणुकीत मिळाले. मोठय़ा संघर्षांनंतर बोर्डीकरांना अक्षरश: धूळ चारून भांबळे यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
गंगाखेड मतदारसंघ तर राज्यात धनशक्तीसाठी गाजला. पाच वष्रे मतदारसंघात संपर्क ठेवायचा नाही व ऐन वेळी पसा ओतायचा, ही घनदाट यांची जुनी सवय. मागील निवडणुकीत डॉ. केंद्रे भाजपचे उमेदवार होते, तर घनदाट अपक्ष. त्या निवडणुकीत डॉ. केंद्रे यांचा पराभव झाला. मात्र, पराभवानंतरही स्थानिक राजकारणात केंद्रे सक्रिय राहिले. पण काँग्रेस, शिवसेना, भाजप, घनदाट मित्रमंडळ या सर्वाच्या समीकरणातून ‘गंगाखेड पॅटर्न’ अस्तित्वात आला. केंद्रे यांच्याविरोधात त्यांच्या विरोधकांनी सतत आघाडी उघडली. या निवडणुकीतही केंद्रे यांच्याविरोधात घनदाट यांच्यासह ‘कोटय़धीश’ रत्नाकर गुट्टे होते. घनदाट व गुट्टे यांना निवडणुकीच्या काळात पसेवाटप प्रकरणात अटकही झाली.
मागील पराभव व स्थानिक राजकारणात सातत्याने ‘लक्ष्य’ झाल्यानंतर केंद्रे यांनी मतदारांना भावनिक आवाहन केले. त्यास मतदारांनी प्रतिसाद दिला. जिंतूरहून भांबळे, तर गंगाखेडहून केंद्रे विजयी झाले. या विजयाला संघर्षांची किनार होती, तशीच दोघांच्या मागे सहानुभूतीची भावना होती. केंद्रे व भांबळे यांनीच जिल्ह्यात ‘घडय़ाळाचा गजर’ घुमवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shining of watch in parbhani
First published on: 21-10-2014 at 01:30 IST