राहाता: शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असल्याने तेथे भाविकांची वर्षभर मोठी गर्दी असते. भारत- पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर साई मंदिराची सुरक्षा यंत्रणा वाढविण्यात आली असून मंदिर परिसरात प्रवेश करताना प्रवेशद्वारावर हार-फुले व पाकिटांची ‘स्कॉनिंग मशिन’द्वारे तपासणी करण्यात येत असून गरज भासल्यास अतिरिक्त बंदोबस्त मागवणार असल्याची माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

चार ते पाच दिवसांपूर्वी शिर्डीच्या साई संस्थानच्या अधिकृत मेल आयडीवर मंदिर पाईप बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली होती. या धमकीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस व साई संस्थानची सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली होती. शिर्डीचे साई मंदिर हे दहशतवाद्यांच्या हिटलीस्टवर असल्याचे काही वर्षांपूर्वी केंद्रीय गुप्तचर विभागाने अहवाल दिला होता तसेच भारत- पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आता मंदिराच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर कधी नव्हे ती भक्तांची तपासणी सुरू झाली.

साई मंदिर सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस की जे नेहमी आपल्याजवळील हत्यारे बाजूला ठेवून खुर्चीवर बसून मोबाइलमध्ये व्यस्त असतात, तेही सतर्क झाल्याचे पाहावयास मिळाले. स्कॅनिंग मशीनद्वारे पर्स, प्रसादाच्या बॅग, हार, फुले यांची तपासणी होत आहे. मंदिरात मोबाइल, कॅमेरे नेण्यास सक्त बंदी करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस यंत्रणा सतर्क

साईमंदिराचे बॉम्बशोध पथक (बीडीएस) आणि डाॅग स्काॅड पथक मंदिर व परिसराची कसून तपासणी करीत आहे. साईबाबा मंदिराचे ९७३ सुरक्षा कर्मचारी आणि पोलीस पथक बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. यासंदर्भात संस्थानच्या सर्व यंत्रणांची बैठक घेऊन सुचना करण्यात आल्या आहेत. परिसरात काही संशयास्पद वस्तू आढळल्यास भक्तांनी संस्थानच्या सुरक्षा यंत्रणेशी संपर्क साधावा. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुरक्षा यंत्रणेची आढावा बैठक झाली. त्यासंबंधी मंदिर परिसरातील सुरक्षेच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. – गोरक्ष गाडीलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी साईबाबा संस्थान, शिर्डी