राहाता: शिर्डी शहराची मतदारसंख्या ३३ हजार आहे, त्यातील १६ हजार ओबीसी समाजाचे असल्याने या समाजाला निर्णय प्रक्रियेत योग्य स्थान मिळणे अत्यावश्यक आहे. यासाठी समाजाने आपली ताकद आणि एकता ओळखणे गरजेचे आहे. जर कोणी म्हणाले की तुम्ही अल्पसंख्याक आहात, तर त्यांना सांगा आम्ही १६ हजार आहोत. आम्ही अल्प नाही, आम्ही निर्णायक आहोत, असा ठराव शिर्डीत झालेल्या ओबीसी समाजाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.

शिर्डी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील ओबीसी समाजाची प्रथमच बैठक झाली. बैठकीत ओबीसी समाजाने आपले अधिकार आणि शहर विकासासाठी ठोस संकल्प करीत एकता आणि सामर्थ्य दाखवले. ज्येष्ठ मार्गदर्शक हिरामण वारुळे अध्यक्षस्थानी होते. यावेळी बाबूजी पुरोहित, सोपान वाघचौरे, बाळू परदेशी, देवराम सजन, किशोर बोरावके, सुनील सोनवणे, दीपक वारुळे, बाळासाहेब लुटे, यशवंत वाघचौरे, पंढरीनाथ शेकडे, प्रभाकर गिते आदी उपस्थित होते.

यावेळी ओबीसी समाजाने शहर विकासात केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाचा गौरव करण्यात आला. विशेषतः बाबूजी पुरोहित, सोपान वाघचौरे, हिरामण वारुळे, बाळू परदेशी आदींनी दिलेले योगदान अधोरेखित केले. समाजाला निर्णय प्रक्रियेत योग्य स्थान मिळावे यासाठी समाजाने आपली ताकद ओळखणे गरजेचे आहे. भविष्यातील नेतृत्व तयार करणे, तरुण आणि महिलांचा सहभाग वाढवणे, स्थानिक समस्या सोडवणे, संघटना मजबूत करणे, चिन्ह बनविणे, सर्व समाजाची लोकसंख्या गणना करणे, नगरपरिषद निवडणुकीत ओबीसी आरक्षित व खुल्या गटातील जागांवर मूळ ओबीसी उमेदवारालाच मतदान करणे, ओबीसी भवन व समाजमंदिर उभारणे, रोजगार निर्मिती करणे, मेळावा आयोजित करणे आणि शहराला नवीन नेतृत्वाचा पर्याय देणे हे प्रस्ताव बहुमताने मंजूर करून यावर विशेष लक्ष केंद्रीत केले गेले. यासाठी कोअर कमिटी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी सुधीर शिंदे, भारत शिंदे, प्रमोद नागरे, संदीप रोकडे, कुणाल वारुळे, मंगेश खांबकर, अशोक पवार, गणेश वाघचौरे, सोमराज कावळे, बद्रीनाथ लोखंडे, अजय नागरे, उत्तम सजन, गणेश खैरे, संतोष जाधव, योगेश शिंदे, गणेश सोनवणे, नानासाहेब काटकर, संपत जाधव, रोहित सोळंकी, संजय परदेशी, शेखर सालकर, प्रशांत भालेराव, प्रशांत वाकचौरे, सहदेव बढे, सुनील मांजरेकर, धनंजय साळी, बद्रीनाथ वाकचौरे, संदीप बोबडे, रवी कोलकर, अजय वारुळे आदींची भाषणे झाली, प्रास्ताविक ॲड. विक्रांत वाघचौरे यांनी केले तर आभार सुरेश मुळे यांनी मानले.