शिर्डीच्या साईबाबांचं नाव मतदारयादीत समाविष्ट करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑनलाइन प्रणालीचा गैरवापर करत शिर्डीच्या मतदारयादीत बेकायदेशीरपणे हे नाव नोंदवण्यात आलं होतं. याप्रकरणी राहता पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास उशीर केल्याचा आरोप केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी रोजी हा प्रकार घडला आहे. इरो-नेट या ऑनलाइन प्रणालीचा गैरवापर करत साईबाबांचं नाव मतदार यादीत नोंदवण्यात आलं होतं. नायब तहसीलदार एस एच म्हस्के यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार केली.

नमुना क्रमांक 6 भरत मतदार यादीत साईबाबांचं नाव समाविष्ट करण्यात आलं होतं. सोबत साईमंदिराचा पत्ताही देण्यात आला होता. छाननीदरम्यान ही गोष्ट तहसीलदार एस एच म्हस्के यांच्या लक्षात आली. यानंतर त्यांनी राहता पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.