राहाता : सध्या मराठमोळ्या खाद्यपदार्थांची चव खवय्यांच्या जिभेवर रेंगाळत आहे. त्यातूनच आता शिर्डी येथील श्रीसाईबाबा संस्थानच्या प्रसादालयात मराठमोळ्या ‘साई आमटी’चा समावेश करण्यात आला आहे. आरोग्य आणि घरगुती चवीचा अनोखा संगम असणाऱ्या साई आमटीच्या प्रसादातून भक्तांना पोषण, सात्त्विकता मिळणार आहे. दर गुरुवारी ही साई आमटी चपाती किंवा गरमागरम भातासोबत प्रसादरूपात भक्तांना दिली जाणार आहे.

साईबाबा संस्थानच्या भोजनगृहात दररोज हजारो भाविक प्रसादाचा लाभ घेतात. रोजच्या प्रसादापेक्षा साईभक्तांना आता नवीन साई आमटीची चव घेता येणार आहे. पौष्टिकता आणि सात्त्विकता हीच तिची खासियत ठरणार आहे. श्री साईबाबांच्या ‘सात्त्विक अन्नातून सेवा’ या परंपरेला अनुसरून संस्थांकडून ही आमटी तयार केली जाणार आहे. प्रसादालयाचे प्रमुख संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम साकारला आहे. राष्ट्रपती भवनातील आचाऱ्यांना महाराष्ट्रीय पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण देणारे आचारी रवींद्र वहाडणे आणि प्रल्हाद कर्डिले महाराज यांनी ही साई आमटी रेसिपी तयार केली आहे.

आहारतज्ज्ञांच्या मते ही आमटी म्हणजे प्रथिनांचे भांडार आहे. मूग, मीठ आणि हरभरा डाळीची पौष्टिक त्रिसूत्री, स्निग्धतेसाठी शेंगदाणे आणि खोबऱ्याचा स्पर्श, कमी तेल आणि संतुलित मसाले या आमटीला परिपूर्ण बनवतात. मोहरी-जिऱ्याच्या सुवासिक फोडणीत परतलेला कांदा, आले-लसूण आणि कढीपत्ता यांची चव मनाला भिडते. फायबर, जीवनसत्त्वे आणि कॅल्शिअमने समृद्ध असा हा प्रसाद असणार आहे. साईभक्तांना या आमटीच्या रूपाने घरच्या जेवणाचा आनंद मिळेल.

कमी तेल आणि कमी तिखट वापरल्याने ती पचायला अतिशय हलकी आहे. प्रथिनांमुळे स्नायूंचे आरोग्य, फायबरमुळे पचनक्रिया आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. कॅल्शिअम, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध आमटी आरोग्यासाठी परिपूर्ण आहार ठरणार आहे. काल गुरुवारी या आमटीचा शुभारंभ प्रसादालयात करण्यात आला.

साई प्रसादालयात भक्तांना दररोज मोफत भोजन दिले जाते. आता दर गुरुवारी चपाती किंवा गरम भातासोबत पौष्टिक साई आमटी भक्तांना मिळणार आहे. विशेषतः गुरुवार हा साईभक्तांसाठी महत्त्वाचा दिवस असल्याने त्या दिवशी साई आमटीला वेगळे स्थान असेल. प्रसादालयातील भोजनात सात्त्विकता, स्वच्छता आणि पौष्टिकतेला प्राधान्य दिले जाते. ही नवी आमटी आरोग्यपूर्ण आहाराचे उदाहरण ठरेल व प्रसादातील चवीला नवी ओळख देईल. सात्त्विक अन्नातून सेवा करण्याच्या संस्थानच्या परंपरेला ती अधोरेखित करत असून, भक्तांना पौष्टिक प्रसादाचा नवा अनुभव मिळेल असा विश्वास साईबाबा संस्थानच्या प्रसादालय प्रमुख संजय शिंदे यांनी सांगितले