राहाता: श्री साईबाबांनी १५ ऑक्टोबर १९१८ रोजी, विजयादशमीच्या दिवशी, समाधी घेण्याअगोदर समकालीन साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना प्रसाद म्हणून ९ चांदीची नाणी दिली होती. श्री साई सतचरित्र ग्रंथात त्याचा उल्लेख आहे. ही नाणी श्रीमती शैलजा शंकर गायकवाड व ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गायकवाड यांच्या अखत्यारीत सुरक्षित असल्याचे धर्मादाय उपायुक्तांच्या चौकशीत निष्पन्न झाले. त्यामुळे ट्रस्ट विरोधातील तक्रारीत तथ्य नसल्याचा निकाल धर्मादाय उपायुक्त श्रीमती पाटील यांनी दिल्याची माहिती ‘साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट’चे अध्यक्ष अरुण गायकवाड यांनी आज, मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
शिर्डी येथील साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टकडे असलेली ९ नाणी तसेच या ट्रस्टला देणगी, भेटवस्तू, लेखापरीक्षण देणगी पावत्यांबाबत अनियमितता असल्याची तक्रार शिर्डी शहरातील संजय शिंदे, सर्जेराव कोते आदींनी चार वर्षांपूर्वी धर्मादाय उपायुक्त कार्यालयात तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यात तथ्य नसल्याचा निकाल दिला आहे.
या निकालाबाबत गायकवाड यांनी सांगितले की, शिर्डीतील काही नागरिकांनी अहिल्यानगर येथील धर्मादाय कार्यालयाकडे तक्रारी केल्या होत्या. त्या अनुषंगाने सुनावणी झाली. तक्रारदार पुरावे सादर करू शकले नाहीत व हजरही झाले नाहीत. ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गायकवाड यांनी ट्रस्टकडील देणग्या याबाबत पुरावे सादर केले. ट्रस्टच्या डिडमध्ये साईबाबांनी लक्ष्मीबाईंना ९ नाणी प्रसाद म्हणून दिल्याचा उल्लेख आहे. ही नाणी श्रीमती शैलजा शंकर गायकवाड व अध्यक्ष गायकवाड यांच्या अखत्यारीत सुरक्षित असल्याचे निष्पन्न झाल्याचा निकाल धर्मादाय उपायुक्तांनी दिल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
धर्मादाय उपायुक्तांनी सर्व पुराव्यांचे अवलोकन करून तक्रारीत तथ्य नसल्याचे दिसून आल्याने अहिल्यानगर येथील धर्मादाय उपायुक्तांनी तक्रार निकाली काढली. तत्कालीन धर्मादाय उपायुक्त श्रीमती पाटील व सध्याचे धर्मादाय उपायुक्त जगताप यांनी निकाल दिला. श्री साईबाबांनी समकालीन भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना दिलेली चांदीची ९ नाणी साईभक्तांचे श्रद्धास्थान असल्याने त्याबाबत पुढील काळात कोणी आकसाने बदनामी केल्यास कायदेशीर कारवाई करू. – राजेंद्र वाबळे, विधीज्ज्ञ, साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट, शिर्डी.