छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, तुता-यांचा रोमांच उभा करणाऱ्या आवाजात जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहात साजरा करण्यात आला. आज सकाळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात प्रतापगडावर (ता. महाबळेश्वर) भवानी मातेची मंत्रोच्चाराच्या गजरात षोडशोपचार पुजा बांधण्यात आली. व्यवस्थापक ओंमकार देशपांडे यांनी पौरोहित्य केले. त्यानंतर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते आई भवानीची मनोभावे आरती करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येथे क्लिक करुन पाहा या सोहळ्याची काही खास क्षणचित्रे

भवानी मातेच्या मंदिरासमोरील ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या ह्रस्ते विधिवत पूजन करुन शिवशाहीचे प्रतीक असणाऱ्या भगव्या ध्वजाचे रोहण मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी संगिता राजापूरकर चौगुले, महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा पाटील आदी उपस्थित होते.ध्वजारोहणानंतर मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली. छत्रपतींची मूर्ती असलेल्या या पालखीची मिरवणूक प्रतपगडावर काढण्यात आली.

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्यासह सर्व उपस्थित मान्यवरांनी पालखी घेऊन मिरवणूक मार्गस्थ केली. पालखीचे शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याजवळ आगमन झाल्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पुष्प अर्पण करुन भक्तिभावे पूजन करण्यात आले. यावेळी ‘क्षत्रिय कुलावतंस, राजाधिराज….’, या ललकारींने, शिवरायांच्या जयजयकाराच्या घोषणांनी वातावरण भारुन गेले होते. शिवपुतळयावरील ध्वजस्तंभावर मान्यवरांच्या हस्ते ध्वजांचे पुजन करुन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते भगव्याचे ध्वजारोहण केले. यानंतर सातारा पोलीस दलाच्या बॅण्ड पथकाने विविध धून वाजवून मानवंदना दिली.

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी शिवप्रताप दिन साध्या पद्धतीने व कमी लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येत असल्याचे सांगून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शिवप्रताप दिनाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या.या सोहळ्यास विविध विभागांचे शासकीय अधिकारी उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv pratap din 2020 celebrated on pratapgad fort scsg
First published on: 21-12-2020 at 14:29 IST