Jyoti Mete : विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये बैठकांचा धडाका सुरु आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने आज ९९ उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली आहे. तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादीही लवकरच जाहीर करण्यात येईल, असं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. अशातच अनेक नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याचंही पाहायला मिळत आहे.

आज शिवसंग्राम पक्षाच्या नेत्या ज्योती मेटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून बीडमधून ज्योती मेटे यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आज शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत ज्योती मेटे यांचा पक्ष प्रवेश पार पडला आहे. या पक्ष प्रवेशानंतर ज्योती मेटे यांनी प्रतिक्रिया देताना उमेदवारीसंदर्भात सूचक भाष्य केलं आहे.

हेही वाचा : भाजपच्या ९९ जणांच्या पहिल्या यादीत पुण्यातील तीन आमदारांना पुन्हा उमेदवारी चंद्रकांत पाटील,माधुरी मिसाळ आणि सिद्धार्थ शिरोळे

ज्योती मेटे काय म्हणाल्या?

“राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश करत असताना विधानसभा निवडणुकीचेच कारण आहे. आमची शिवसंग्राम संघटना समाजकारण करते. त्यामुळे समाजकारणाला राजकारणाची जोड देऊन पुढे जाण्यासाठी हा पक्ष प्रवेश केला आहे. बीड विधानसभा मतदारसंघासाठी आम्ही आमचा प्रस्ताव मांडलेला आहे. आमची यासंदर्भात चर्चा झालेली आहे. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला. त्यामुळे आम्ही पक्षाने सांगितलेली सर्व जबाबदारी योग्य पद्धतीने पार पडणार आहोत”, अशी प्रतिक्रिया ज्योती मेटे यांनी पक्ष प्रवेश केल्यानंतर दिली.

शिवसंग्राम संघटनेची धुरा कोण सांभाळणार?

ज्योती मेटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केल्यानंतर शिवसंग्राम संघटनेची धुरा कोण सांभाळणार? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला असता ज्योती मेटे म्हणाल्या, “शिवसंग्राम संघटनेची धुरा कोण सांभाळणार हा विषय नाही. आपल्या सर्वांना आठवत असेल की विनायक मेटे यांच्या निधनानंतर झालेल्या आमसभेत माझी एकमताने अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यामुळे संघटनेची धुरा कोण सांभाळणार हा प्रश्न निर्माण होत नाही”, असं त्यांनी म्हटलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बीडमधून ज्योती मेटेंना उमेदवारी मिळणार?

ज्योती मेटे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून बीडमधून ज्योती मेटे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची विधानसभेसाठी उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही. पण बीडमधून ज्योती मेटेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत त्यांनी स्वत: देखील सूचक विधान केलेलं आहे.