एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकाणात खळबळ उडाली आहे. जलील यांच्या या प्रस्तावामुळे राज्यात नवे राजकीय समीकरण जुळणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र एमआयएमने महाविकास आघाडीबरोबर आघाडी करण्याची योजना मांडली असली तरी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी हा प्रस्ताव फेटाळला आहे. शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी एमआयएमला जातीयवादी तसेच रझाकारी प्रवृत्तीचा पक्ष म्हणत भगव्याला न मानणाऱ्या संघटनांशी शिवसेना जोडली जाणार नाही, असं स्पष्टपणे सांगितलं आहे.

त्यानंतर अंबादास दानवे यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि खासदार इम्तियाज जलील यांचा एक फोटो फेसबुकवर पोस्ट केला आहे. यामध्ये “जलील फडणवीसांना म्हणत आहे की, मी महाविकास आघाडीत सामील होण्याचा प्रस्ताव देतो. त्यावर फडणवीस म्हणत आहेत की, मग मी लगेच ठाकरेंच्या नावाने बोंब मारत हिंदुत्वाच्या गप्पा मारतो,” असे बोलत असल्याचे म्हटले आहे.

युतीच्या ऑफरनंतर अंबादास दानवे यांनी जलील यांच्यासह एमआयएमवर जोरदार टीका केली होती. “एमआयएम ही संघटना जातीवादी तसेच रझाकारी प्रवृत्तीची आहे. भगव्याला न मानणाऱ्या संघटनांशी आम्ही कसे जोडले जाणार? औरंगजेबासमोर हे लोक गुडघे टेकतात. अशा संघटनेशी शिवसेना कधीही जोडली जाणार नाही. भगव्याला विरोध करणारी संघटना आहे. या विचारांशी शिवसेना कधीही तडजोड करू शकत नाही आणि या प्रस्तावाचे शिवसेनेला कोणतेही देणेघेणे नाही, असे अंबादास दानवे यांनी म्हटले होते.

“औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होणारे…”; एमआयएमनं दिलेल्या ऑफरवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

तर फडणवीसांचाच हा डाव आहे, असा थेट आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरल्यानंतर आता काय करायचे म्हणून फडणवीसांनी हा बी प्लॅन आखला आहे, यामुळे शिवसेना आक्रमक होईल, महाविकास आघाडी तुटेल, असे त्यांचे मनसुबे आहेत. पण भाजपाची ही इच्छा कधीही पूर्ण होणार नाही, असे चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान,औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होणाऱ्या एमआयएमबरोबर उघड वा छुपी आघाडी होऊच शकत नाही. ज्यांच्याबरोबर छुपी हातमिळवणी आहे त्यांना लखलाभ ठरो, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली. एमआयएम हा समविचारी पक्ष आहे हे या पक्षाने आधी सिद्ध करावे. उलट हा पक्ष कोणाचा ब संघ आहे हे लोकांना चांगलेच कळले असल्याचे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.