अलिबाग- रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजा केणी हे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर नाराज आहेत. प्रकल्पग्रस्तां बाबत उदय सामंत यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप राजा केणी यांनी केला आहे. प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाकडे उद्योगमंत्री दुर्लक्ष करत असल्याच करत असल्याने, आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांविरोधात अलिबाग येथील एमआयडीसी कार्यालयावर येत्या १५ मे रोजी मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
अलिबाग तालुक्यातील शहापूर धेरंड परिसरात परिसरात सिनारमन्स कंपनीचा महाकाय कागद प्रकल्प येऊ घातला आहे. या कारखान्यासाठी अद्याप भूसंपादन पुर्ण झालेले नाही मात्र तरीही पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी ३५६ कोटीच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या जमीनीतून पाईपलाईन जाणार आहे त्या शेतकऱ्यांना अजिबात विश्वासात घेण्यात आलेले नाही. शेतकऱ्यांना देशोधडीला लावून उद्योगांना पायघड्या घालणाऱ्या या प्रकरणात राज्याच्या उद्योग मंत्रालयाची भूमिका संशयास्पद आरोप खारेपाट विभाग शेतकरी संघटनेचे प्रमुख तर्था शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी केला आहे.
प्रकल्पासाठी एकरी ९६ लाख ६९ हजार तर हेक्टरी २ कोटी ४१ लाखांचा दर देऊ केला आहे. जो शेतकऱ्यांना मान्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीला वाढीव मोबदला मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून सातत्याने केली जात आहे. मात्र त्याकडे उद्योग विभागाने दुर्लक्ष केले आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांशी कुठलिही चर्चा झाली नसतांना दुसरीकडे त्यांनी शेतकऱ्यांची पिकती शेती काहीही मोबदला न देता बळकावण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. यामुळेही शेतकरी संतापले आहेत.
प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यात येत असून एकूण एमआयडीसी फेज टू अंतर्गत ७३६ हेक्टर भूसंपादन केले जाणार आहे. या प्रकल्पासाठी नागोठणे ते बांधण या २८ किलोमीटर लांबीची भली मोठी पाईप लाईन टाकली जाणार आहे. यासाठी १६७ कोटी ०८ लाख २५ हजार २५४ रुपये खर्चुन पाईपलाईन टाकण्याचे काम व हे पाणी उचलण्यासाठी बांधण येथे १८९ कोटी ७० लाख ३५ हजार ३२६ रुपये खर्चुन जॅकवेल बांधली जाणार आहे. यासाठीची मोजणी करुन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) ने निविदा प्रक्रिया पुर्ण केली. त्यामुळे शेतकरी नाराज आहेत.
एकीकडे खारेपाट ग्रामस्थ पाणीटंचाईने व्याकुळ आहेत. तर दुसरीकडे शासनाने त्यांना पाणी देण्याऐवजी सिनारमन्स या प्रस्तावित उद्योगासाठी पाणी देण्चाचा घाट उद्योग विभागाने घातला आहे. राज्याच्या उद्योग विभागाची ही संशायास्पद भूमिका असल्याचे राजा केणी यांनी म्हटले आहे. त्यामुळे नव्या पाईप लाईन टाकण्याचा कामाला विरोध दर्शवला आहे. जो पर्यंत धेरंड-शहापुरती ताबडतोब रद्द करावी व सदर शेतकऱ्यांनी केलेल्या मागण्यांचा सहानभूतीपूर्वक विचार करावा अन्यथा १५मे रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अलिबाग येथील कार्यालयावर शेतकऱ्यांच्या आक्रोश मोर्चाला सामोरे जा असा इशारा केणी यांनी दिला आहे.