लाच स्वीकारणाऱ्या महापौर तृप्ती माळवी यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने शनिवारी महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. महापालिकेतील पदाधिकारी व अधिकारी यांच्या भ्रष्टाचारामुळे महापालिकेचे नाव बदनाम होत असल्याने महापालिका बरखास्त करावी अशी मागणी करण्यात आली.
महापौर तृप्ती माळवी व त्यांचे स्वीय सहाय्यक अश्विन गडकरी यांना शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १६ हजाराची लाच स्वीकारल्याप्रकरणी ताब्यात घेतले. या दोघांवर अटकेची कारवाई होणार आहे. या कारवाईमुळे कोल्हापूरची बदनामी झाली आहे, असा मुद्दा उपस्थित करून शिवसेनेच्या वतीने शनिवारी महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आल्यावर शहरप्रमुख दुर्गेश िलग्रस, विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसनिकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. लाच स्वीकारणाऱ्या महापौर माळवी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करतानाच त्यांच्या धिक्काराच्या घोषणाही देण्यात आल्या. बरखास्त करा, महापालिका बरखास्त करा या घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी दुर्गेश िलग्रस म्हणाले, महापालिकेतील भ्रष्टाचाराने टोक घातले आहे. यासाठी महापालिका बरखास्त करण्याची कारवाई केली पाहिजे. शहराला काळीमा फासणाऱ्या लाचखोर महापौर तृप्ती माळवी यांच्यावर कारवाई व्हावी. महापालिकेतील भ्रष्टाचार उघड होण्यासाठी सीबीआय चौकशी करावी. पदाधिकारी किंवा अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट साखळीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
आंदोलन करणारे शिवसनिक अचानक आक्रमक झाले. त्यांनी मुख्य प्रवेशद्वाराचा बंद दरवाजा ढकलून आत घुसण्याचा प्रयत्न सुरू केला. यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई हे निवेदन स्वीकारण्यासाठी मुख्य प्रवेशद्वाराजवळ आले. त्यांना निवेदन देण्यात आले.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena front for action on trupti malvi
First published on: 01-02-2015 at 03:45 IST