अलिबाग – शासनाचे काम आणि सहा महिने थांब अशी एक म्हणून प्रचलित आहे. पण हल्ली शासनाचं काम आणि काही वर्ष थांब असं म्हणायची वेळ लोकांवर आली आहे. याचीच प्रचिती सध्या रायगड करत नाही येत आहे. रस्त्याचे काम होत नाही म्हणून सत्ताधारी शिवसेनेला सरकारविरोधात आक्रमक होण्याची वेळ आली आहे.
अलिबाग ते रोहा रस्त्याच्या दुरवस्थेवरून सत्ताधारी शिवसेना आता आक्रमक झाली आहे. या रसत्याच्या दुरूस्तीच्या कामाला तातडीने सुरूवात करावी अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे. १० नोव्हेंबरपर्यंत काम सुरू झाले नाही तर स्वखर्चाने आणि श्रमदानातून दुरूस्ती करण्याची तयारी येथील ग्रामस्थांनी दाखवली आहे.
शिवसेनेचे अलिबाग तालुकाप्रमुख अनंत गोंधळी यांच्या नेतृत्वाखालील परीसरातील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता एम. एम. धायतडक यांची भेट घेतली.या मार्गावरील वेलवली ते वावे फाटापर्यंतच्या रस्त्याची पार दुर्दशा झाली असून या मार्गावरून वाहन चालवणे केवळ अशक्य झाले आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले असून प्रवास करताना गरोदर महिला, विद्यार्थी, वयोवृध्द प्रवासी यांचे प्रचंड प्रमाणात हाल होत आहेत. खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाणसुद्धा वाढलेले आहेत. किंबहुना या रस्त्यावर मोठमोठे अपघात होवून जिवीत हानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असल्याची भीती यावेळी व्यक्त करण्यात आली.
या रस्त्याचे दुरुस्तीचे काम १० नोव्हेंबर पासून चालू करावे. असे न केल्यास हे काम आम्ही ग्रामस्थ स्वखर्चातून व आमच्या श्रमदानातून १२ नोव्हेंबर पासून चालू करू. पुढे काही झाल्यास त्यास पूर्णपणे आपले विभागीय कार्यालय जबाबदार राहील असेही या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
ठेकेदारांतील वाद
अलिबाग ते रोहा रस्त्याच्या रूंदीकरण आणि नूतनीकरणाचे काम हॅम (हायब्रीड अॅन्युईटी मॉडेल ) या पदधतीने विकसीत केला जात आहे. या कामासाठी तब्बल २२९ कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत. दोन वर्षांपूर्वी या रसत्याचे काम सुरू करण्यात आले परंतु आजही ते अर्धवट अवस्थेत आहे. यामुळे या मार्गावरील प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. ज्या ठेकेदाराने हे काम घेतले होते त्याने उपठेकेदार नेमून काम सुरू केले परंतु या उपठेकेदाराला केलेल्या कामाचे पैसे मिळाले नसल्याने त्याने हे काम थांबवल्याचे सांगितले जाते. मात्र ठेकेदारांमधील वादाचा नाहक फटका प्रवाशांना बसतो आहे.
काळ्या यादीत टाका
ठेकेदाराने जे काम केलं आहे त्याचे बहुतांश बिल अदा करण्यात आले आहे परंतु उर्वरीत रकमेसाठी तो काम करत नाही अशी माहिती बांधकाम विभागाच्या अधिकारयांनी दिली. असं असेल तर प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे. जर 10 नोव्हेंबर पर्यंत काम सुरू झाले नाही तर आम्ही दुरूस्तीचे काम स्वखर्चाने करू. -अनंत गोंधळी, अलिबाग तालुका प्रमुख शिवसेना
केलेल्या कामाचे ठेकेदाराला १०४ कोटी रुपये देण्यात आले आहेत. अजून १४ कोटी द्यायचे आहेत पण निधी उपलब्ध नाही, त्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. निधी प्राप्त झाल्यावर उर्वरित काम करु अशी भूमिका ठेकेदाराने घेतली आहे. मात्र रस्त्याची दुरुस्ती करावी अशा सुचना आम्ही देत आहोत. – एम एम धायतडक, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग
