राज्याच्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात मोठ्या घोषणा करण्यात आल्या. यामध्ये माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा सरकारने केली. मात्र, या योजनेच्या लाभासाठी अनेक जाचक अटी घातल्याचा आरोप विरोधक करत आहेत. जवळपास एक कोटी महिलांना माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिन्याला दीड हजार रुपये, देण्यात येणार आहेत. योजनवरून आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. “अडीच वर्ष सरकारला बहिणी आठवल्या नाहीत का?”, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

“महायुती सरकारने मांडलेल्या गाजर अर्थसंकल्पाची चिरफाड जनता करत आहे. दोन वर्ष सत्तेत असताना यांना कधीही बहिणींची किंवा शेतकऱ्यांची आठवण झाली नाही. ही तीच भाजपा आहे, जेव्हा दिल्लीत शेतकरी आंदोलनाला बसले होते. तेव्हा त्यांच्यावर लाठीचार्ज केला होता. त्यांना अतिरेकी म्हटलं होतं. त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. महाराष्ट्रातही याच भाजपा सरकारने त्यांना अर्बंन नक्षलवादी म्हटले होते”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना केली.

हेही वाचा : “…अन् मी घाबरून तिथून पळ काढला”; राज ठाकरेंनी सांगितला ३१ डिसेंबरच्या रात्रीचा ‘तो’ किस्सा!

“लाडकी बहिण योजनेसाठी दीड हजार रुपये दिले जाणार आहेत. मात्र, आम्ही त्यांना आठ हजार रुपये देण्याची मागणी केली होती. त्यातही त्यांनी १०० अटी घालून ठेवल्या आहेत. त्यानंतरही समजा ते दीड हजार रुपये मिळाले तरी आज दीड हजार रुपयांमध्ये काय होणार? आता भारतीय जनता पक्षाच्या सरकारने जी महागाई करून ठेवली आहे. त्यामध्ये या दीड हजार रुपयांमध्ये काय होणार आहे. आता निवडणुकीत पराभव होईल, या भितीने काहीतरी करायचं म्हणून सरकार काहीतरी घोषणा करत आहे”, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सरकारने कोणत्या घोषणा केल्या?

अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अतिरिक्त अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात त्यांनी महिलांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. मध्य प्रदेशच्या लाडली बेहेन योजनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राने लाडकी बहीण योजना आणली आहे. एक कोटी महिलांना माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना महिना दीड हजार रुपये, ५२ लाख महिलांना वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर, १० हजार महिलांना ई-रिक्क्षा खरेदीसाठी अर्थसाह्य, मुलींना मोफत उच्चशिक्षणासह आदी महत्वाच्या घोषणा महायुती सरकारने केल्या आहेत. दरम्यान,‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि मोफत शिक्षण या दोन्ही महत्त्वाकांक्षी योजनांमध्ये घालण्यात आलेल्या अटी जाचक असल्याची टीका आता विरोधक करत आहेत.