शिवसेना(ठाकरे गट) संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपावर टीका करताना मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. मागील काळात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसह अन्य महापुरुषांबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. विरोधकांनी राज्यपालांविरोधात आक्रमक भूमिका घेत, त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली होती. याच मुद्य्यावरून आज पुन्हा एकदा संजय राऊत यांनी जोरदार टीका केली.

संजय राऊत म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर यांची वाचा गेलेली आहे. तुम्ही आम्हाला काय सांगता? मुळात भाजपाच्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कधीच प्रेम नव्हतं. काही वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी, मग मुंबईत मोठे त्यांचे शिवाजीराजांशी तुलना करणारे होर्डिंग्ज लागले. पण यांना छत्रपती शिवाजी महाराज, मराठी साम्राज्य, मराठी माणूस यांच्याविषयी अजिबात प्रेम नाही. हे सगळं वरवरचं चालेलं आहे, आतमधून ओठांवर यावं लागतं. जर ते प्रेम खरोखर असतं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राजभवनाच्या दरवाज्यावर लाथ मारून आत गेले असते आणि राज्यपालांनी जो अपमान केलाय, शिवाजी महारजांचा त्यावर जाब विचारला असता. संपूर्ण सरकार दिल्लीला आलं असतं आणि अमित शाहांना भेटून त्यांनी सांगितलं असतं, की शिवाजी महाराजांच्या अपमान करणाऱ्या या राज्यपालाला ताबडतोब बदला. मात्र त्यांनी असं केलं नाही, हे ढोंगी लोक आहेत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या अगोदर संजय राऊत काय म्हणाले होते? –

“कुणालाही हे मान्य नाही की राजभवनात बसून घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीने शिवाजी महाराजांचा, महात्मा फुले-सावित्रीबाई फुलेंचा अपमान करावा. हे महाराष्ट्र सहन करणार नाही. कारण हे महान व्यक्ती महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. त्यांचं महाराष्ट्राच्या मातीशी नातं आहे. नंतर ते विश्वाचे झाले. त्यामुळे त्यांचा अपमान कसा सहन केला जाईल?”