मोहन अटाळकर, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमरावती : शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अनधिकृत पुतळा हटविण्यात आल्यानंतर उफाळून आलेला वाद निवळत असतानाच आता आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या हनुमान चालिसा प्रकरणाने राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत. 

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि रिपाइंच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या खासदार नवनीत राणा यांचा हिंदूत्ववादी कल, आमदार रवी राणा यांनी भाजपला दिलेला पाठिंबा, राणा दाम्पत्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील टीकासत्र आणि राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे प्रसिद्धीतंत्र यातून अमरावतीचे राजकारण अलीकडच्या काळात टोकदार बनत चालल्याचे चित्र आहे.

अमरावतीकरांनी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि नवनीत राणा यांच्यातील संघर्ष तब्बल दशकभर अनुभवला आहे. नवनीत राणा यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे अनुसूचित जातीचा दाखला मुंबई उपनगर उपजिल्हाधिकाऱ्यांकडून मिळवला असल्याचा आरोप करत अडसूळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले. राणा यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली, सध्या या प्रकरणात सुनावणी सुरू आहे. राणा दाम्पत्य आणि शिवसेनेत कायम खटके उडत आले आहेत. आधी अडसूळ त्यांचे लक्ष्य होते, आता त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर टीका चालवली आहे. त्यामुळे शिवसैनिक संतप्त झाले आहेत. त्याचे पडसाद काल-परवा अमरावतीत उमटले आणि शिवसैनिक राणांच्या निवासस्थानी मोर्चा घेऊन धडकले.

ताजा विषय हा हनुमान चालिसाचा आहे. राज ठाकरे यांनी दिलेला इशारा आणि राणांनी थेट मुख्यमंत्र्यांना दिलेले आव्हान हे स्वतंत्र विषय असले, तरी शिवसेनेला कोंडीत पकडण्याची राणांची खेळी लपून राहिलेली नाही. उद्धव ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांपासून दूर गेल्याचा राणांचा आक्षेप आहे. त्यांनी हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्या घरी हनुमान चालिसाचे पठण करावे, अन्यथा आपण मातोश्रीह्णवर जाऊन पठण करू, असा इशारा राणा दाम्पत्याने दिल्यानंतर शिवसैनिक खवळले. आधी अमरावतीच्या शिवसेना कार्यकर्त्यांचा सामना राणांनी करावा, असे आव्हान देण्यात आले. आपण मातोश्रीह्णवर जाणारच, असा राणा दाम्पत्याचा दावा आहे. त्यामुळे येत्या काळात पोलिसांची डोकेदुखी वाढणार आहे.

राणा दाम्पत्याच्या सततच्या आरोपांमुळे शिवसैनिक अस्वस्थ झाले आहेत. आमचा संयम आता संपला, असे सांगत  शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राणांच्या निवासस्थानावर काढलेल्या मोर्चादरम्यान शिवसैनिकांनी घोषणाबाजी करताना वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेतून त्याचे संकेत मिळाले आहेत. पण, ही भाषा ज्वालाग्राही होऊ नये, याची काळजी सत्तारूढ शिवसेनेला घ्यावी लागणार आहे.

नवनीत राणा यांनी निवडून आल्याबरोबर केंद्रातील भाजप सरकारला पािठबा दिला, तर आमदार रवी राणा यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकट जाण्याचा प्रयत्न चालवला. त्यामुळे शिवसेना कार्यकर्ते अवाक झालेच, पण या प्रकाराने स्थानिक भाजप कार्यकर्तेही अस्वस्थ झाले आहेत. महापालिका निवडणूक तोंडावर आहे. अशा स्थितीत राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या भूमिकेला महत्व आले आहे. या संपूर्ण प्रकरणातून मतांच्या धृविकरणाचा प्रयत्न होत असल्याचे उघड बोलले जात आहे.

सद्यस्थितीत राणा दाम्पत्य आणि शिवसैनिक आमने-सामने आहेत. राणा दाम्पत्याने मंदिरांवर लावण्यासाठी भोंग्यांचे वाटप करून शिवसेनेला आणखी डिवचले आहे. हा संघर्ष आता कोणते वळण घेणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्राला लागलेली साडेसाती मिटविण्यासाठी व शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, व्यापारी, उद्योजक, गृहिणी, विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिक यांच्या प्रगतीसाठी आणि सर्व महाराष्ट्रवासीयांच्या सुख, समृद्धी आणि शांतीसाठी आम्ही मातोश्रीसमोर हनुमान चालिसाचे वाचन करणार म्हणजे करणार.

 –नवनीत राणा, खासदार, अमरावती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena may conflict against rana couple over hanuman chalisa zws
First published on: 20-04-2022 at 02:03 IST