रत्नागिरी :  येथील जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी शिवसेनेअंतर्गत ठरलेल्या निकषांप्रमाणे संगमेश्वर तालुक्याला संधी मिळाली असून सर्वात युवा सदस्य आणि माजी आमदार सुभाष बने यांचे चिरंजीव रोहन बने यांची अध्यक्षपदी, तर उपाध्यक्षपदी गुहागरचे महेश नाटेकर यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण पडल्यामुळे शिवसेनेत इच्छुकांची भाऊगर्दी होती. या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी साडेदहा वाजता उमेदवार निवडीसंदर्भात टीआरपी येथे जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यात रत्नागिरी संपर्कप्रमुख सुधीर मोरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. सेनेचे सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, मावळत्या अध्यक्षा स्वरूपा साळवी  यांच्यासह प्रमुख पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. सर्वसाधारण गटातील सदस्यांनाच संधी दिली जाणार असल्याचे संकेत शिवसेनेच्या वर्तुळातून मिळाले होते. बैठकीत संपर्कप्रमुख मोरे यांनी अध्यक्षपदासाठी रोहन बने, तर उपाध्यक्षपदासाठी गुहागरचे महेश नाटेकर यांचे नाव जाहीर केले. जिल्हा परिषदेचा दोन वर्षांचा कार्यकाल अजून शिल्लक आहे. त्यापैकी एका वर्षांसाठी ही निवड करण्यात आली असल्याचे मोरे यांनी सांगितले.

या निर्णयानंतर सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास दोघांनीही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज सादर केले. जिल्हा परिषदेत शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व आहे.

तसेच राज्यात महाविकास आघाडी असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार उभा केला नाही. दुपारी तीन वाजता निवडणूक प्रक्रिया सुरू  झाली. या वेळेपर्यंत अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्यामुळे निवड बिनविरोध झाली. प्रथेप्रमाणे ज्येष्ठ सदस्य उदय बने यांनी दोघांना शुभेच्छा दिल्या आणि ते बाहेर पडले. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर माजी मंत्री रवींद्र माने, आमदार राजन साळवी, माजी अध्यक्ष राजाभाऊ  लिमये, स्वत: सुभाष बने, संपर्कप्रमुख सुधीर मोरे, रत्नागिरी नगराध्यक्ष बंडय़ा साळवी यांच्यासह अनेकांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली.

या अध्यक्षपदासाठी १५ वर्षे संगमेश्वर तालुक्याला प्रतीक्षा होती. रोहन बनेंच्या रूपाने युवा नेतृत्वाला शिवसेनेकडून संधी दिली गेली. यापूर्वी रोहन यांचे वडील सुभाष बने यांच्या पाठोपाठ रश्मी कदम, राजू महाडिक आणि रचना महाडिक यांनी संगमेश्वर तालुक्याचे प्रतिनिधित्व केले होते.

दरम्यान, सर्वसाधारण प्रवर्गासाठी संधी असल्यामुळे जिल्हा परिषदेतील इच्छुक सदस्यांनी दंड थोपटले होते. त्यामध्ये सर्वात आघाडीवर ज्येष्ठ आणि अनुभवी सदस्य उदय बने होते. त्यापाठोपाठ बाबू म्हाप, बाळशेठ जाधव, महेश नाटेकर आणि विक्रांत जाधव यांची नावे चर्चेत होती. गेले काही दिवस अध्यक्षपदासाठी सर्वच इच्छुक ‘मातोश्री’वर फिल्डिंग लावत होते. उदय बने यांनीही ज्येष्ठत्वाच्या निकषावर संधी मिळावी, अशी मागणी केली होती; परंतु जिल्हा नियोजन मंडळामधील सदस्यांना संधी नसल्याचे कारण पुढे करत त्यांचा पत्ता कट करण्यात आला.

तसेच खुल्या गटातील सदस्यांनाच संधी देणार असल्याचे धोरण जाहीर केल्यामुळे बाबू म्हाप यांचे नाव मागे पडले. अखेर, रोहन बने यांच्यासाठी वडील माजी आमदार सुभाष बने यांच्यासह समर्थकांनी लावलेली फिल्डिंग यशस्वी होऊन रोहन बने यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena rohan bane becomes the chairman of ratnagiri zilla parishad zws
First published on: 02-01-2020 at 03:23 IST