Dhairyasheel Mane : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक नेत्यांचे राज्यभरात दौरे देखील सुरू आहेत. असं असताना शिवसेना (शिंदे) पक्षाचे खासदार धैर्यशील माने यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात बोलताना केलेलं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे.

‘म्हशीला रेडकू झालं तरी खासदाराला बोलवा. मात्र, खासदार दिसत नाही असं म्हणू नका’, असं वक्तव्य धैर्यशील माने यांनी केलं आहे. त्यांच्या या मिश्किल वक्तव्यानंतर व्यासपीठावर एकच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रमांसाठी आपल्याला पोहोचता येईल त्या ठिकाणी आपण जाण्याचा प्रयत्न करत असतो असंही यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी म्हटलं आहे.

धैर्यशील माने काय म्हणाले?

“तुमच्या वाढदिवसाला येणार हे मी तुम्हाला दिल्लीत असतानाच सांगितलं होतं. आता परत खासदार दिसत नाही म्हणून असं म्हणू नका. एखाद्या म्हशीला जरी रेडकू झालं तरी खासदाराला बोलवा. मी त्या ठिकाणी येईल. पण खासदार दिसत नाही असं म्हणू नका. ज्या ज्या ठिकाणी पोहोचता येईल त्या ठिकाणी मी जात असतो. आज सात कार्यक्रम आहेत त्या ठिकाणीही पोहोचत आहे”, असं धैर्यशील माने यांनी म्हटलं आहे.

“समाजाच्या प्रत्येक भूमिकेला कुठेतरी आवाज बनवा लागतो. काही वेळेला कटू सत्य देखील सांगावं लागतं. नेतृत्व फक्त गोड बोलणारं असू शकत नाही. प्रसंगी वाईटपणा देखील घेणारा नेता असावा लागतो. वाईटपणा घेऊन जेव्हा समाजाचं कल्याण होतं त्यावेळी ते नेतृत्व आणखी उजळून निघतं”, असंही धैर्यशील माने यांनी म्हटलं आहे.