Uday Samant On Jayant Patil : महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन झालं. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं होतं. या अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. या अधिवेशनामध्ये आमदारांचा शपथविधी पार पडला. विशेष अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असल्यामुळे राज्यातील काही प्रमुख नेत्यांची भाषणं झाली. मात्र, या भाषणाच्या माध्यमातून अजित पवार आणि जयंत पाटील यांनी सभागृहात एकमेकांना चिमटे आणि टोमणे लगावले.

दरम्यान, जयंत पाटील सभागृहात भाषण करत असताना त्यांच्या भाषणातील एक चूक अजित पवारांनी सुधारली. त्यानंतर जयंत पाटील यांनी अजित पवारांकडे पाहत केलेल्या एका विधानामुळे चर्चा रंगली आहे. ‘आपल्या पक्षाचं एक वाक्य आहे, योग्यवेळी योग्य निर्णय’, असं जयंत पाटील यांनी म्हटलं. मात्र, त्यांच्या या विधानाची मोठी चर्चा रंगली आहे. जयंत पाटील यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी जयंत पाटील यांच्याबाबत मोठं विधान केलं. “जयंत पाटील योग्य वेळी योग्य निर्णय घेतील”, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं. दरम्यान, यानंतर आता शिवसेनेचे (शिंदे) नेते उदय सामंत यांनीही भाष्य केलं आहे. ‘जयंत पाटील महायुतीमध्ये येणार असतील तर नक्कीच आम्हाला अभिमान वाटेल, चांगलं वाटेल’, असं उदय सामंत यांनी एबीपी माझा या वृत्तवाहीनीशी बोलताना म्हटलं आहे.

हेही वाचा : Amol Mitkari : मंत्रिमंडळाचा विस्तार कधी? गृहमंत्रिपद कोणाकडे जणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं भाष्य

उदय सामंत काय म्हणाले?

जयंत पाटील यांच्या भाषणात झालेले उल्लेख काही वेगळे संकेत आहेत का? या प्रश्नावर बोलताना उदय सामंत म्हणाले, “ज्यावेळी विनोदाने काही चर्चा होते. सभागृहात अजित पवार जेव्हा म्हणाले की माझं पूर्ण लक्ष तुमच्यावर आहे. त्यानंतर जयंत पाटील असं बोलले आहेत की दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ब्रीद वाक्य आहे की योग्य वेळी योग्य निर्णय. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय जयंत पाटील यांचा कसा होतो? याकडे आमचं सर्वांचं लक्ष लागलं आहे”, असं सूचक विधान उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज झालेल्या भाषणात काही सूचक इशारा आहे असं वाटतं का? यावर बोलताना उदय सामंत म्हणाले, “भाषणातील काही वाक्य अधोरेखित करण्यासारखी होती. त्यातील योग्य वेळी योग्य निर्णय हे वाक्य होतं. त्यामुळे हे सत्यात कधी उतरेल हे जयंत पाटील यांनी ठरवलं पाहिजे. जयंत पाटील यांच्यासारखे व्यक्तिमत्व, त्यांनी अनेकदा अर्थसंकल्प मांडलेला आहे. अनेक खात्याचं काम पाहिलेलं आहे. असा नेता योग्य वेळी योग्य निर्णय या टॅगलाईन खाली महायुतीमध्ये येणार असतील तर नक्कीच आम्हाला चांगलं वाटेल”, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.