रत्नागिरी :राज्य सरकार व भ्रष्ट मंत्र्यांविरोधात सोमवारी सकाळी शिवसेना ठाकरे पक्षाकडून रत्नागिरीत तीव्र आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला.
यावेळी आंदोलनात सत्ताधारी नेत्यांच्या अनेक वादग्रस्त विधानांवर आणि कथित घोटाळ्यांवर टीका करण्यात आली. “सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचे काय जाते?” असे वादग्रस्त विधान करणाऱ्या समाजकल्याण मंत्र्यांवर कारवाई न झाल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. याबरोबर हे सरकार भिकारी आहे, असे म्हणणाऱ्या मंत्र्यांनाही मंत्रिमंडळात कायम ठेवल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी सेनेच्या आंदोलकांनी सत्ताधारी मंत्र्यांच्या अनेक कथित गैरव्यवहारांची यादीच मांडली. यामध्ये समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्यावर ६० कोटींचा घोटाळा आणि १५०० कोटींच्या गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले.
त्याचप्रमाणे, कृषीमंत्री असताना रमी खेळणारे माणिकराव कोकाटे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांबद्दल बोलताना “ढेकळांचे पंचनामे करायचे का?” असे असंवेदनशील विधान करणाऱ्या मंत्र्यांचाही निषेध करण्यात आला.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रीच्या नावे डान्सबार असल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला. यासोबतच, सत्ताधारी मंत्र्यांचे आणि अधिकाऱ्यांचे हनीट्रॅप प्रकरणदेखील आंदोलनात मांडण्यात आले. या आंदोलनात रत्नागिरीतील शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.