विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये ठरल्यानुसार जागा वाटप करण्यात आले. मात्र, जागावाटपात पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघ भाजपाला गेले आहेत. त्यामुळे कसबा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी बंडखोरी केली. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्जही भरला आहे. दरम्यान, कसबा मतदारसंघातील शिवसेनेच्या २०० पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जागावाटपावर नाराजी व्यक्त करत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०१४ची विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणाऱ्या शिवसेना-भाजपाने यावेळी युती केली. त्यामुळे अनेक ठिकाणच्या जागा वाटपामध्ये दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यातून राज्यभरात अनेक ठिकाणी भाजपा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली. महायुतीसमोरील डोकेदुखी वाढत असल्याने दोन्ही पक्षांकडून बंडखोरांवर कारवाई देखील करण्यात आली आहे. दरम्यान, पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघ महायुतीच्या जागावाटपात भाजपाच्या वाट्याला आले आहेत. त्यामुळे शहरातील शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. कसबा, पुणे कॅन्टोमेंट, वडगावशेरी आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करीत अर्ज दाखल केले. पण पक्ष श्रेष्ठीच्या आदेशानुसार तीन विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी माघार घेतली. मात्र, कसबा विधानसभा मतदारसंघामधील शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांची मनधरणी करण्यात शिवसेनेला अपयश आले आहे. ते भाजपाच्या मुक्ता टिळक यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. निवडणुकीची रंगत वाढत असताना, आज कसबा विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक विशाल धनवडे यांच्यासह २०० पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.

राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे बंडखोर नगरसेवक विशाल धनवडे म्हणाले, “यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेला शहरात काही जागा मिळाव्यात, अशी मागणी पक्षाकडे केली होती. मात्र तरी देखील जागा मिळाल्या नाही. त्यामुळे कसबा विधानसभा मतदारसंघामधून अपक्ष लढविण्याचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयावर आज ही कायम आहे. पण आता शहरातील भाजपाचे खासदार गिरीश बापट यांच्याकडून माझ्या कार्यकर्त्यांवर दबाव आणला जात आहे. तसेच माझ्यावर कारवाई करावी, अशी मागणी पक्ष श्रेष्ठींकडे केली जात आहे. हे सर्व पाहून, आता आम्ही पक्षाचा राजीनामा देत आहोत. पण अखेरच्या श्वासापर्यंत शिवसैनिक राहू,” असं ते म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena two hundred activists resign of party in pune bmh
First published on: 16-10-2019 at 17:27 IST