अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीत ज्यांच्याबद्दल नाराजी निर्माण झाली होती, पुन्हा त्याच खासदार संजय राऊत यांच्यावर अहिल्यानगर जिल्ह्यातील महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जबाबदारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोपवली आहे. शहरातील जुने कार्यकर्ते त्यामुळे अस्वस्थ झाले आहेत.

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पक्षाने खासदार राऊत यांच्यासमवेत माजीमंत्री, आमदार अनिल परब, उपनेते साजन पाचपुते व उपनेते सुहास सामंत यांच्यावरही पक्षाने जबाबदारी टाकली आहे. खासदार राऊत यांच्यासह श्रीगोंद्यातील उपनेते पाचपुते यांच्या भूमिकेविषयी तीव्र नाराजी निर्माण झाली होती. संजय राऊत यांच्याविरोधात त्यावेळी पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजीही केली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटात महाविकास आघाडीतील जागा वाटपावरून, विशेषतः दक्षिण जिल्ह्यातील मतदारसंघात प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. त्यास संजय राऊत जबाबदार असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यावेळी जाहीरपणे केला होता. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही.

त्यातूनच ठाकरे गट महापालिकेत पर्यायाने शहरात प्रबळ असताना मोठी गळती सुरू झाली ती अद्यापि थांबलेली नाही. केवळ शहरच नाहीतर अहिल्यानगर तालुका, श्रीगोंदा, पारनेर तालुक्यातूनही ठाकरे गटाला अनेक खिंडारे पडली. त्यातूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्ह्यातील निवडणुकीची जबाबदारी पुन्हा संजय राऊत यांच्यावरच सोपवली गेल्याने शिवसैनिकांत अस्वस्थता आहे. ठाकरे गटाने जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून आमदार सुनील शिंदे यांची पूर्वीच नियुक्ती केलेली आहे. त्यांचा मात्र जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या जबाबदारीत समावेश नसल्याची माहिती मिळाली.

दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी मुंबईत आज, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यास जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, रावसाहेब खेवरे व राजेंद्र दळवी, शहरप्रमुख किरण काळे, उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव आदी उपस्थित होते. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर की आघाडी करून लढवायची याचा उल्लेख पक्षप्रमुखांकडून करण्यात आला नाही.

महापालिका व जिल्हा परिषदेवर भगवा फडकावण्यासाठी तयारीला लागण्याची सूचना पक्षप्रमुखांनी केल्याची माहिती शहरप्रमुख किरण काळे यांनी दिली.