Sanjay Raut on Manoj Jarange Patil: मराठा आंदोलनाचा प्रश्न चिघळला असून ३१ ऑगस्ट रोजी तिसऱ्या दिवशीही हे आंदोलन मुंबईत सुरू आहे. मराठा आंदोलकांनी दक्षिण मुंबईतील आझाद मैदानच्या लगतचा परिसर व्यापला आहे. शिंदे समितीने मनोज जरांगेंशी चर्चा केल्यानंतरही काही तोडगा निघू शकलेला नाही. यावर आता विरोधक सरकारवर जोरदार टीका करत आहेत. शिवसेनेचे (ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी आज सकाळच्या पत्रकार परिषदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजीराजे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली.
हजारो मराठा बांधव मुंबईत आंदोलन करत आहेत. देशाचे गृहमंत्री अमित शाह हे गणपतीच्या दर्शनासाठी मुंबईत आले होते. त्यांच्याबरोबर भाजपाचे सर्व लटांबर होते. उपमुख्यमंत्री शिंदेंचे शेपूटही त्यांच्याबरोबर होते. मुंबईत इतके मोठे आंदोलन सुरू आहे. हा विषय केंद्राशी संबंधित आहे. अशावेळी ते मराठा आंदोलनातील प्रमुख नेत्यांची भेट घेऊन त्यांना दिलासा देतील, अशी अपेक्षा होती. जे गृहमंत्री काश्मीरचा प्रश्न सोडविण्यासाठी घटनेत बदल करून कलम ३७० हटवू शकतात, ते गृहमंत्री मराठा समाजाच्या न्याय हक्कांसाठीसुद्धा घटनेत बदल करू शकतात. पण त्यांनी ते केले नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
अमित शाह यांनी मुंबईत येऊन भाजपा संघटनेला सांगितले की, मुंबई महानगरपालिकेचा महापौर हा भाजपाचाच म्हणजे अमराठी व्हायला पाहिजे. गृहमंत्री लालबागला येऊन प्रार्थना करतात की, मुंबईचा महापौर हा भाजपाचा उपरा होऊ द्या. पण त्यांना मराठी बांधवाकडे जाऊन त्यांचे दुःख विचारण्याचा वेळ नव्हता.
अमित शाहांनी केलेला प्रकार अत्यंत क्रूर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल मुंबईत असताना त्यांना मराठा आंदोलकांची भेट घ्यायला जाता आले असते. पण ते गेले नाहीत. हा प्रकार महाराष्ट्राच्या बाबतीत अत्यंत क्रूर आणि अमानुष होता. त्यांना तिथे जाऊन एखादी बैठक घेता आली असती. त्यांना तोडगा काढता आला असता. पण ते फक्त मुंबईचा महापौर भाजपाचा असल्याचे सांगून गेले, हे अतिशय दुर्दैवी.
फडणवीसांचे सरकार मराठी माणसाच्या मुळावर
फडणवीस यांच्या सरकारमधील लोक एकमेकांना संपविण्याच्या भानगडीत मराठी बांधवांनाच संपवत आहेत. एकनाथ शिंदेंना अमित शाहांच्या मागे शेपटी हलवत फिरताना लाज वाटायला हवी होती, अशी जहरी टीका संजय राऊत यांनी केली. मराठी माणूस संपवायला आणि मुंबई गिळायला निघालेल्या माणसाबरोबर तुम्ही फिरत आहात, असेही ते म्हणाले.
छत्रपती उदयनराजे, संभाजीराजे यांनी…
छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजीराजे यांनी आझाद मैदानात जाऊन मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर बसायला पाहिजे होते. पण ते भारतीय जनता पक्षाचे हस्तक झाले आहेत. अनेक मराठा नेते हे भाजपाच्या दबावाखाली आहेत, हे दुर्दैव आहे या राज्याचे, असेही संजय राऊत म्हणाले.