कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून काम केले असल्याने जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती आपल्याला जवळून माहीत आहे. देशात नरेंद्र मोदींची लाट असल्याने शिर्डी लोकसभा मतदारसंघातून आपला विजय निश्चित आहे, असा विश्वास शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी बुधवारी शिर्डी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
बबन घोलप यांची शिर्डीतील उमेदवारी अडचणीत आल्याने त्यांच्याऐवजी शिवसेनेने लोखंडे यांना ऐनवेळी मैदानात उतरवले आहे. लोखंडे यांनी मंगळवारी शिर्डी येथे येऊन साईंचे दर्शन घेतले. त्यानंतर शिर्डी येथील शिवालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमदार अशोक काळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, तालुकाप्रमुख कमलाकर कोते, सचिन कोते, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष भीमराव बागूल आदी या वेळी उपस्थित होते.
लोखंडे म्हणाले, आपण गेल्या २० वर्षांपासून भाजप-शिवसेना युतीचे कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. कर्जत-जामखेडचा आमदार म्हणून पंधरा वर्षे काम करताना जिल्हय़ात व्यापक संबंध आले. त्याचा या निवडणुकीत आपल्याला फायदाच होईल. भाजपचे नेते नितीन गडकरी व गोपीनाथ मुंडे यांच्याशी आपले चांगले संबंध आहेत. मात्र एका नेत्यामुळे भाजपला सोडून आपण मनसेत प्रवेश केला होता. सध्या देशात काँग्रेसच्या विरोधात प्रचंड लाट तयार झाली असून, खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी साईबाबा व शिवसेनेला फसविले असल्याने त्यांच्याबद्दल जनतेत तीव्र नाराजी आहे. या नाराजीचाही मला लाभ होणार असून माझा विजय निश्चित आहे असे ते म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 27th Mar 2014 रोजी प्रकाशित
शिर्डीत शिवसेनेचाच विजय- लोखंडे
देशात नरेंद्र मोदींची लाट असल्याने शिर्डी लोकसभा मतदारसंघातून आपला विजय निश्चित आहे, असा विश्वास शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी बुधवारी शिर्डी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

First published on: 27-03-2014 at 03:30 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv senas victory in shirdi lokhande