संभाजी भिडे यांनी आज पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. तसंच आत्ता असलेलं सरकार हे प्रामाणिक आहे. त्यांनी तुम्हाला जे आश्वासन दिलं आहे ते पूर्ण करून घेण्याची जबाबदारी माझी असेल. तुम्ही उपोषण मागे घ्या आणि लढा सुरू ठेवा आम्ही सगळे तुमच्या पाठिशी आहोत असा शब्द दिला. याचवेळी त्यांनी शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांचंही कौतुक केलं. ही माणसं शब्द फिरवणारी नाहीत हे लक्षात घ्या असंही त्यांनी म्हटलं. संभाजी भिडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर पत्रकारांनी संभाजी भिडेंना लाठीचार्जवरही प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी सविस्तर उत्तर दिलं.

काय म्हणाले संभाजी भिडे?

“गोष्ट अशी आहे की ही सगळं गुंतागुंतीचं आहे. लाठीचार्ज करणारे शिंदे, फडणवीस आणि अजित पवार नव्हते. यंत्रणा आणि यंत्रणेतली माणसं परिपक्व बुद्धीतली असतीलच असं नाही.समजा लाठीचार्ज ज्यांनी केला असेल तरीही पोलीसही वाईट वृत्तीचे आहेत असं म्हणण्याची आवश्यकता नाही. असं करा असे इच्छा असलेले राज्यकर्ते महाराष्ट्रात नाही. आदेश दिला असेल तर भावना वाईट नसणार. कारण त्यांनी निलंबनाचे आदेशही दिलेच आहेत. कुठल्याही चांगल्याही व्यक्तीला हे वाटणार नाही की आंदोलनकर्त्यांना झोडपलं पाहिजे.” अशी भूमिका संभाजी भिडे यांनी घेतली आहे.

हे पण वाचा- “मनोज जरांगे पाटील यांना कळकळची विनंती…”, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचं ट्विट

संभाजी भिडे यावेळी काय म्हणाले?

मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेला लढा हा अभिमानास्पद, कौतुकास्पद आणि योग्य आहे. त्यांच्या या लढ्याला यश येणार यात माझ्या मनात काहीच शंका नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला १०० टक्के यश येणार आहे. हा प्रश्न राजकारणाच्या पातळीवर असला तरीही या महाराष्ट्राचे मुख्यमत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्या निर्णयावर अवलंबून आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वतीने मी शब्द देतो की मनोज जरांगे यांना जे हवंय ते घडवल्याशिवाय शांत बसणार नाहीत. या लढ्याचा शेवट मराठा समाजाला आरक्षण मिळण्यातच झाला पाहिजे. आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत. त्यांनी लढा सुरु ठेवावा पण उपोषण मागे घ्यावं ही विनंती मी त्यांना करायला आलो आहे असं संभाजी भिडे म्हणाले.

हे पण वाचा- संभाजी भिडेंच्या पाठिंब्यानंतर मनोज जरांगे पाटील म्हणतात, “आमच्यासाठी आरक्षण महत्त्वाचं आहे, मग ते…”

मनोज जरांगे पाटील यांनी काय म्हटलं आहे?

आमच्यासाठी आरक्षण महत्त्वाचं आहे, कुणीही द्या. आज भिडे गुरुजींनी आमच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. आमची ताकद वाढते आहे. कुणीही आलं तरीही आम्ही त्यांचा पाठिंबा स्वीकारणारच. एकाचा पाठिंबा घ्यायचा आणि दुसऱ्याचा नाकारायचा हे आमचं धोरण नाही. असं जो करतो तो चळवळीचा कार्यकर्ता नसतो असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. आज मनोज जरांगे पाटील यांना संभाजी भिडे यांनी पाठिंबा दिला आहे. तसंच तुम्ही उपोषण मागे घ्या आणि लढा सुरु ठेवा अशी विनंती केली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी ही भूमिका घेतली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सरकार त्यांच्या परिने प्रयत्न करतं आहे, आमचा लढा आमच्या पातळीवर सुरू आहे. सगळ्या महाराष्ट्राचा एकच उद्देश आहे की मराठा समाजाला आरक्षण हवं आहे. भिडे गुरुजी आंदोलनात जोडले गेल्याने आम्हाला बळ मिळालं आहे. आंदोलनाचं बळ वाढतं आहे. प्रत्येक माणसाचं, प्रत्येक घटकाचं बळ आवश्यक आहे. आम्हाला आरक्षणच हवं आहे, कुणीही द्या. भावना महत्त्वाची नाही आमच्या समाजासाठी आम्हाला आरक्षण महत्त्वाचं आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी संंभाजी भिडे यांच्या भेटीनंतर म्हटलं आहे.