आमच्यासाठी आरक्षण महत्त्वाचं आहे, कुणीही द्या. आज भिडे गुरुजींनी आमच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. आमची ताकद वाढते आहे. कुणीही आलं तरीही आम्ही त्यांचा पाठिंबा स्वीकारणारच. एकाचा पाठिंबा घ्यायचा आणि दुसऱ्याचा नाकारायचा हे आमचं धोरण नाही. असं जो करतो तो चळवळीचा कार्यकर्ता नसतो असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. आज मनोज जरांगे पाटील यांना संभाजी भिडे यांनी पाठिंबा दिला आहे. तसंच तुम्ही उपोषण मागे घ्या आणि लढा सुरु ठेवा अशी विनंती केली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी ही भूमिका घेतली.

सरकार त्यांच्या परिने प्रयत्न करतं आहे, आमचा लढा आमच्या पातळीवर सुरू आहे. सगळ्या महाराष्ट्राचा एकच उद्देश आहे की मराठा समाजाला आरक्षण हवं आहे. भिडे गुरुजी आंदोलनात जोडले गेल्याने आम्हाला बळ मिळालं आहे. आंदोलनाचं बळ वाढतं आहे. प्रत्येक माणसाचं, प्रत्येक घटकाचं बळ आवश्यक आहे. आम्हाला आरक्षणच हवं आहे, कुणीही द्या. भावना महत्त्वाची नाही आमच्या समाजासाठी आम्हाला आरक्षण महत्त्वाचं आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी संंभाजी भिडे यांच्या भेटीनंतर म्हटलं आहे.

हे पण वाचा- “एकनाथ शिंदे लबाडी…”, संभाजी भिडेंनी मनोज जरांगे पाटलांना सांगितलं; म्हणाले, “त्यांनी दिलेला शब्द…!”

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्टपासून उपोषण आंदोलन सुरु केलं आहे. आत्तापर्यंत तीनवेळा मनोज जरांगे पाटील यांना सरकारच्या वतीने उपोषण मागे घेण्यासाठी विनंती करण्यात आली आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं नव्हतं. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा १५ वा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावल्यामुळे उपोषण मागे घेण्याची विनंती पुन्हा एकदा करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संभाजी भिडे यावेळी काय म्हणाले?

मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेला लढा हा अभिमानास्पद, कौतुकास्पद आणि योग्य आहे. त्यांच्या या लढ्याला यश येणार यात माझ्या मनात काहीच शंका नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला १०० टक्के यश येणार आहे. हा प्रश्न राजकारणाच्या पातळीवर असला तरीही या महाराष्ट्राचे मुख्यमत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्या निर्णयावर अवलंबून आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वतीने मी शब्द देतो की मनोज जरांगे यांना जे हवंय ते घडवल्याशिवाय शांत बसणार नाहीत. या लढ्याचा शेवट मराठा समाजाला आरक्षण मिळण्यातच झाला पाहिजे. आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत. त्यांनी लढा सुरु ठेवावा पण उपोषण मागे घ्यावं ही विनंती मी त्यांना करायला आलो आहे असं संभाजी भिडे म्हणाले.