महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने अडचणीत आलेल्या शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या उपस्थितीत मंगळवारी स्वातंत्र्यदिनादिवशी सांगलीत हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्यदिन पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेला पोलीसांनी काही अटींसह सोमवारी परवानगी दिली.
हेही वाचा >>> नवाब मलिक कोणत्या गटात जाणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या…
शिवप्रतिष्ठानच्यावतीने काढण्यात येणार्या हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्यदिन पदयात्रेला परवानगी देण्यात येउ नये अशी मागणी काही पुरोगामी संघटनांनी केली होती. पोलीस अधिकारी व संघटनेचे पदाधिकारी यांची आज बैठक झाली. या बैठकीनंतर पदयात्रेला परवानगी देण्यात येत असल्याचे पोलीसांनी सांगितले. या पदयात्रेमध्ये संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे हे स्वत: हजर राहणार असल्याचे सांगण्यात आले. पदयात्रेच्या अनुषंगाने पोलिसांनी शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना नोटिसा बजावत आक्षेपार्ह घोषणाबाजी आणि जातीय तेढ निर्माण होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या दिल्या सूचना दिल्या आहेत. या अटी पाळूनच पदयात्रा काढण्यात यावी, जर काही अनुचित प्रकार घडला तर या नोटीसाच पुढील कारवाईसाठी पुरावा म्हणून वापरण्यात येतील असेही नोटीसमध्ये म्हटले आहे.